ठाणे- महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. २४ तासांत पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केल्याने व्यथित झालेल्या आव्हाड यांनी लोकशाहीची हत्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नसल्याचे सांगत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या घोषणेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात ७२ तासांत दोन २ खोटे गुन्हे दाखल केले, तेहा ३५४ सारख्या कलमांचे.. मी ह्या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत असे त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चाणक्य नाही, तो शकुनी मामा आहे. शिंदे साहेब जपून रहा असा सल्ला देणारे ट्विट केले आहे.
दरम्यान राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावर संतप्त व आक्रमक झाले आहेत. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर लागलीच पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केला होता. त्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली व त्यानंतर लागलीच पोलिसांनी तत्परतेने त्याची दखल घेत गुन्हा दाखल केला.
आव्हाड यांना नुकतेच ठाण्यातील चित्रपटगृहातील प्रकाराबद्दल अटक करण्यात आली व त्यांना कोर्टाने जामीन दिला. मात्र त्यानंतर लागलीच पुन्हा त्यांच्यावर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.