मुंबई – महान्यूज लाईव्ह
विभक्त पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांना शिंदे गटाने प्रवेश देतानाच वाघमारे यांनी शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या संघटनेच्या मुलख मैदानी प्रमुख तोफ बनलेल्या सुषमा अंधारे यांच्यावर टिकास्त्र सोडले. आपल्या पोटच्या मुलीला कधी छातीला धरून दूध पाजलं नाही, पण संजय राऊतांसाठी अश्रू डोळ्यात आणले अशी टिका केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी भावनिक पोस्ट आपल्या मुलीसाठी लिहीली.. पण त्यांनी हे लिहीताना शिंदे गटाला मार्मिकपणे आंबेडकरी विचारांचा आधार घेत भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत असा मार्मिक टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी आज फेसबुक पोस्ट लिहून जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत, त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. अन् तरीही तुम्ही घाबरत नसाल तर तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील.. असे गर्भित भाष्य केले आहे.
गेल्या महिन्यापासून जनप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून तसेच समाजमाध्यमातून सुषमा अंधारे ज्या पध्दतीने बोलत आहेत, त्यानुसार कोणालाच त्यांचा प्रतिवाद करता येत नाही. सध्या राज्यातील शिंदे व भाजप गट सुषमा अंधारे या एकाच नावाने अस्वस्थ आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अंधारे यांचा आवाज दाबण्यासाठी नोटीसा देण्यापासून सभा रद्द करण्यापर्यंत बरेच प्रयत्न झाले, मात्र त्याचा काहीच फरक पडला नसल्याने अखेर त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावरच मोहिनीस्त्र शिंदे गटाने टाकले.
आज शिंदे गटात प्रवेश करताना वैजनाथ वाघमारे यांनी लवकरच पर्दाफाश करु’, असे वक्तत्व केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या मुलीसाठी एक फेसबुक पोस्ट लिहीली, जी भावनिक तर आहेच, शिवाय महाराष्ट्राचे राजकारण किती नीच थराला चाललेले आहे, याची चुणूक देणारी आहे.
फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे आपल्या पाच वर्षाच्या कबिरा या लेकीविषयी नेमकं काय म्हणाल्यात?
“तू फक्त ४५ दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता. पण अख्ख कुटुंब पाठीशी उभं राहिलं. विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला.
दुबईत दोन तास बोलून मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले. बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!”
तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात.
बाबासाहेब लिहितात, “जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत, त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील.. भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा”
सुषमा अंधारे यांनी ही पोस्ट लिहीताना जरी ती भावनिक लिहीली असली, तरी त्यात गर्भित इशारेही आहेत. मी रडणारी नाही, लढणारी आहे असे सांगत आता सुषमा अंधारे कशा प्रकारे महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन केल्या जाणाऱ्या राजकारणाबाबत काय भाष्य करतात याची आता उत्सुकता आहे.