सोलापूर – महान्यूज लाईव्ह
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी हनुमंत शिंदे यांना एनडीपीएस या अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून जुलै २०२१ मध्ये अटक केली होती. त्या शेतकऱ्याला उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दरम्यान या प्रकरणात उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे. शेतकऱ्याच्या वकीलाने केलेल्या युक्तिवादात गांजाची झाडे आणि त्याच्या पानांना मादक पदार्थ म्हणजे ड्रग्ज म्हणता येणार नाही असा युक्तीवाद मांडला गेला होता, तो ग्राह्य धरत न्यायालयाने हेच निरीक्षण नोंदवत हनुमंत शिंदे याला जामीन मंजूर केला.
मोहोळ तालुक्यातील शेतकरी हनुमंत शिंदे यांच्या शेतात पोलिसांनी धाड टाकून ६५ किलो गांजाची झाडे व पाने जप्त केली होती. त्यावरून त्याला जुलै 2021 मध्ये अटक केली. सोलापूर जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात त्याच्या बाजूने अॅड. धैर्यशील सुतार यांनी युक्तिवाद केला.
न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमोर सुनावणी झाली. अॅड. सुतार यांनी युक्तिवाद करताना पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा चुकीचा असल्याचे मत मांडले. पोलिसांनी शिंदे यांच्या शेतातून झाडांना लागलेल्या मातीसहित वजन केल्याने हे वजन वाढवून लावले असल्याचा युक्तीवाद केला.
सर्वात महत्वाचे म्हणजे झाडाचे पान, माती व रोप येत नाही. तर या झाडाची फळे आणि फुले यांचा समावेश होतो. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना अटकच बेकायदा असाल्याचा दावा करून जामीन देण्याची विनंती केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी हनुमंत शिंदे यांना जामीन मंजूर केला
दरम्यान यापूर्वी देखील न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने २९ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीला अटकपूर्व जामीन देताना फुले किंवा फळे नसलेली भांगाची वनस्पती गांज्याचा कक्षेत येत नाही असे निरीक्षण नोंदवत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
न्यायालयाने यासंदर्भातील व्याख्या सांगितली होती, त्यामध्ये झाडाच्या वरच्या भागात बिया आणि पानांसह फुले किंवा फळे असतील, तर तो गांजा मानला जाईल, मात्र जर बिया आणि पाने त्याच्या वरच्या भागासह नसतील, तर तो गांजा मानला जाणार नाही. कुणाल कडू याच्या प्रकरणात न्यायालयाने हे मत नोंदवले होते.