बारामती – महान्यूज लाईव्ह
सव्वीस वर्षाचा तो बारामती तालुक्यातील बाबुर्डीचा युवा सरपंच गावात तर राबतोच, पण सोशल मिडियावर राष्ट्रवादीचा किल्ला बाणेदारपणे लढवतो.. काल रात्री गावच्या पोलिस पाटलांनी राजू लव्हे यांनी इच्छा व्यक्त केली आणि आज बंधाऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाबुर्डी परिसरात पोचलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चला, सरपंचांच्या घरी चहा प्यायला जायचंय असे सांगितले आणि कित्येक वर्षे ज्याच्या घरात आपला नेता यावा अशी इच्छा होती, ती अचानकच फलद्रूप होणार म्हटल्यावर सरपंच माऊलीच्या घरात जणू सोनियाचा दिवस उगवला..!
बाबुर्डी गावचा युवा सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांच्या घरी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अचानक भेट दिली. अचानक थेट दादाच घरी आल्याने माऊली पोमणेंचा आनंद गगनात मावेना. बरे, दादांनी फक्त घरी घेऊन चहाच घेतला नाही, तर अगदी निवांतपणे दादांनी पाऊणतासाचा वेळ दिला. एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन दादांनी घरातील प्रत्येक सदस्याची विचारपूस केल्याने बाबुर्डीकरांनाही मोठा आनंद झाला. विशेष म्हणजे पोमणे यांच्या घरी जाण्यापूर्वी दादांनी मिश्कीलपणे माझ्याबरोबर एवढे लोक आहेत, सगळ्यांना एवढ्या लवकर चहा मिळेल का? असे विचारले, मात्र कोणाचे उत्तर येण्यापूर्वीच दादा आपल्या लाडक्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोचले होते..!
बाबुर्डीच्या सरपंचपदी निवड झालेला ज्ञानेश्वर पोमणे हा तालुक्यातील सर्वात युवा सरपंच आहे. त्याने सरपंचपदी निवड झाल्यापासून सातत्याने गावच्या कारभारात लोकसेवकाची भूमिका बजावली. त्याचे कौतुक सर्वत्र होत असते. एवढेच नाही, तर राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीविरोधात भाजप आयटी सेल अथवा विरोधकांकडून होणाऱ्या हल्ल्याला ज्ञानेश्वर पोमणे सडेतोड उत्तर देत सोशल मिडियावर पक्षाचा किल्ला प्रामाणिकपणे लढवत असतो.
आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माऊलीच्या घरी भेट दिल्यानंतर माऊलीची विचारपूस केली. माऊलीकडून त्याच्या कामाची माहिती घेतली. माऊलीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांशी मनमोकळे बोलून दादा पुढच्या प्रवासाला रवाना झाले, तेव्हा गेली काही वर्षे एकट्याचा प्रवास कायम करून प्रसिध्दीत न राहता, पक्षाचे अविरत काम करणारा तो निष्ठावंत कार्यकर्ता दान पावल्यासारखं भारावून गेला होता…!