मुंबई- महान्यूज लाईव्ह
आतापर्यंत अंत्यसंस्काराच्या सामानाची दुकाने आहेत हे माहिती होतं.. पण अंत्यसंस्कारासाठी चक्क इव्हेंट कंपनी?… हो.. आणि तिची उलाढाल त्या मालकाला २ हजार कोटींवर न्यायचीय…ही गंमत नाही.. परदेशात ज्यांची मुले आहेत, ती आपल्या आई,बाबाच्या मृत्यूनंतर स्वगृही येतातच असे नाही. .अशांसाठी त्यांचे जाणे एकाकी होऊ नये यासाठी काळाची गरज लक्षात घेऊन मुंबईत खास अंत्यसंस्कारासाठी ही कंपनी सुरू झाली आहे.
मुंबईतील संजय रामगुडे यांना ही सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट नावाची कंपनी स्थापन केली आहे. अंत्यसंस्काराचे कंत्राट ही कंपनी घेते. या क्षेत्रात त्यांना व्यवसाय दिसला आणि माणूसकीची संवेदनशीलताही! अर्थात फक्त प्रसिध्दीसाठी हा स्टंट नाही. रामगुडे यांनी आतापर्यंत या कंपनीच्या माध्यमातून ५ हजार जणांवर अंत्यसंस्कार केलेले आहेत हे विशेष! काशीच्या घाटावर चित्रपट शुटींगच्या निमित्ताने गेल्यानंतर रामगुडे यांना जे दृश्य दिसले, त्यातून त्यांच्या मनात या कंपनीने जागा केली आणि त्यांनी कंपनी स्थापन केली. आज या कंपनीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
या कंपनीची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी देखील ट्विट करून लोकांची अखेरची चिंताही दूर करण्याचा व्यवसाय करता येतो हे फारच हटके आहे अशा शब्दांत त्यांनी रामगुडे यांचे कौतुक केले.
ही गंमत नाही. वस्तुस्थती आहे. जसे सन २०२० मध्ये कोरोना आला आणि अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक नाहीत अशी परिस्थिती स्थानिक ठिकाणीही दिसून आली. मात्र सन २०३० नंतरचा काळ अधिक प्रमाणात तसा असेल, परदेशात किंवा हजारो किलोमीटर दूर अंतरावर असलेले आपले जिवलग, नातलग आपल्या अंत्यसंस्काराला स्थानिक ठिकाणी येतीलच असे नाही अशा चिंतेत असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
यातील आणखी महत्वाची बाब म्हणजे रामगुडे यांनी ज्या ५ हजार जणांवर हे अंत्यसंस्कार केले आहेत, त्यातून ५० लाखांची उलाढाल झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात ही उलाढाल त्यांना २ हजार कोटींवर न्यायची आहे. किंबहूना परिस्थितीच अशी निर्माण होईल की, ती २ हजार कोटींवर त्याची उलाढाल जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये या कंपनीचे सदस्य बनला, त्यासाठी अगोदरच बुकींग केले, तर त्याकरीता त्या सदस्यास ३७ हजार ७०० रुपये आकारले जातात. त्याच्या सर्व सुविधा कंपनी पुरवते. तर फक्त अंत्यसंस्कार करायचे झाले, तर ८,५०० ते १२,५०० रुपये खर्च आकारला जातो.
रामगुडे यांच्या कंपनीत आता २० कर्मचारी आहेत. त्यांच्या कंपनीकडे अगोदर अॅडव्हान्स बुकींग केले आणि त्या व्यक्तीचे निधन झाले, तर एका तासाच्या आत कंपनीचे खास प्रशिक्षित कर्मचारी तेथे पोचतात. मग सारी जबाबदारी स्वतःकडे घेतात. तिरडी बांधणे, पाणी गरम करणे, मडक्यांपासून ते अंत्यसंस्काराच्या साहित्यापर्यंत तसेच स्मशानभूमीच्या नोंदणीपर्यंत सर्व कामे हे कर्मचारी करतात. त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कारही करतात आणि त्या-त्या धर्मानुसार शेवटच्या क्षणी प्रार्थनाही करतात.