सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर येथील न्यायालयामध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली विविध प्रकारची एकूण १०४ फौजदारी व दिवाणी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व इंदापूर दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या वतीने काल शनिवारी (दिनांक १२ नोव्हेंबर) इंदापूर न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केलेली होती.
सकाळी साडेदहा वाजता दीपप्रज्वलन करून लोक अदालतीस प्रारंभ करण्यात आला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालत पार पडली.
सदर लोक अदालत यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये शेकडो नागरिकांना आपली प्रकरणे निकाली काढण्याची संधी मिळाली. अनेक वर्षे विभक्त राहणारी विवाहित जोडपी, बँकांची अनेक वर्षे थकीत असणारी कर्ज व गहाण खत प्रकरणे,वीज बिलासंदर्भातील वादविवाद, वाहतूक पोलीस यांच्याकडून करण्यात आलेल्या कार्यवाही, कौटुंबिक व भावभावकी मधील शेती संदर्भातील असणारी वाटप संदर्भात असणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली. एकूण सुमारे १०४ प्रकरणे निकाली निघाली तसेच ८५,६७,९३३ (८५लाख ६७ हजार ९३३रुपये) चे सेटलमेंट झाली.अशी माहिती न्यायाधीश तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश ल.पाटील यांनी दिली.
लोकअदालतीत नागरिकांना निगोशिएबल इन्स्टुमेंटन्स ऍक्ट कलम १३८ च्या खाली दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, वीज व पाणी देयकाबाबतची प्रकरणे, इतर तडजोडी बाबत फौजदारी व वैवाहिक प्रकरणे, भूसंपादन बाबतची प्रकरणे, नोकरी बाबतचे पगार, इतर भत्ते व निवृत्ती बाबतची प्रकरणे, महसूल बाबतची प्रकरणे, तसेच इतर दिवाणी प्रकरणे यांचे तडजोडअंती निकाली काढण्यात आली.
यावेळी सह दिवाणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा श्रीमती एस. डी. वडगावकर , प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री के.सी.कलाल व न्यायाधीश श्रीमती एस. एस. साळुंखे,मा.न्यायाधीश श्रीमती जे.बी.खटावकर उपस्थित होते.
यावेळी इंदापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.मनोहर चौधरी, वकील संघटनेचे सचिव ॲड. आशुतोष भोसले, उपाध्यक्ष ॲड. सुभाष भोंग, उपाध्यक्ष ॲड. जमीर मुलाणी,खजिनदार राजेंद्र ठवरे, महिला प्रतिनिधी प्रिया शिंदे-मखरे, सदस्य रुद्राक्ष मेनसे,उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदापूर बार अससोशियने विशेष सहकार्य केले.