शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर शहरालगत असणाऱ्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचा बहाणा करून पेट्रोलपंपावरील सुमारे ४९ हजार ४०० रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ रोजी मध्यरात्री अडीच ते पावणे तीन च्या दरम्यान शिरूर जवळील पाषाणमळा येथील इंडियन ऑईल च्या पेट्रोलपंपावर दुचाकीवरून येत पेट्रोल भरण्याचा बहाणा करून आरोपींनी पंपावरील कामगार यांना शिवीगाळ व आरोपींनी मारहाण केली.
तसेच कोयत्याचा धाक दाखवून पंपावरील कामगार विकासकुमार यांचेकडील व ऑफिस काऊंटर मध्ये असलेली ४९ हजार ४०० रुपये रोख रक्कम तसेच मोबाईल आरोपींनी चोरून नेला. या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.
दरम्यान दिवसेंदिवस शिरूर शहर, बाबुरावनगर आदी परिसरात चोरीच्या घटना वाढत असून पोलिसांची रात्र गस्त वाढवणे गरजेचे आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.