बारामती : महान्यूज लाईव्ह
अकरावीत शिकत असलेल्या मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप असून, हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.
फलटण तालुक्यातील गोखळी येथे अकरावीत शिकणारा अक्षय साधू धुमाळ हा या आठवड्यात मंगळवारी शेतामध्ये गवत काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुपारी त्याला सापाचा दंश झाला. त्याला लगेचच समजले नाही, परंतु काही वेळाने उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्याला दवाखान्यात आणण्यात आले.
बारामतीत सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्यानंतर महिला शासकीय रुग्णालयात देखील त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र बराच काळ त्याच्याकडे लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान त्याच रात्री त्याची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला मिळाला मात्र त्याच्या वडिलांनी अडचणीची स्थिती लक्षात घेत अक्षयला बारामतीतील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. चार दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न डॉक्टर करत होते. मात्र प्रदीर्घ उपचारानंतर आज त्याचं निधन झालं.
या निधनानंतर अक्षयच्या वडिलांनी केलेल्या आरोपामुळे बारामतीतील सरकारी दवाखान्यामध्ये कोरोनाच्या काळात झालेल्या अत्यंत चांगल्या उपचारानंतर शासकीय यंत्रणा उदासीन बनली आहे का? असा प्रश्न मात्र निर्माण होताना दिसतोय. कारण अक्षयच्या वडिलांनी थेट सरकारी यंत्रणेवर आरोप केला आहे डॉक्टरांनी बराच काळ त्याच्यावरती उपचार केले नव्हते आणि हे उपचार लांबल्यामुळेच माझा मुलगा आज माझ्या हातून गेला अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याने मुलाचा मृत्यु झाला असा आरोप मुलाचे वडील साधु धुमाळ यांनी केला. धुमाळ यांना एकच मुलगा होता. जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मुलाच्या वडिलांनी घेतला आहे.