महान्यूज इंटरनॅशनल रिपोर्ट
चीनमध्ये पुन्हा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली असून पहिल्यापेक्षा अधिक गतीमान व अधिक ताकदवान कोरोनाचा विषाणू दिसून आल्यानंतर काल (शुक्रवारी) झालेल्या चाचणीत तब्बल १० हजार ७२९ कोरोनाग्रस्त आढळले, त्यामुळे चीन सरकार खडबडून जागे झाले असून बिजिंगमधील सर्व उद्याने बंद करण्यात आली आहेत.
चीनमधील दक्षिणेकडील ग्वांगझू व चोंगकिंगमध्ये यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दोन प्रांतातील ५ लाख लोक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन आहेत.
आता बिजींगही त्याच मार्गावर आहे. बिजिंगमध्ये काल तब्बल २१ लाख लोकांची चाचणी करण्यात आली. काल दिवसभरात देशात ११ हजार कोरोनाग्रस्त आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. राजधानीतील या अवस्थेने चीन सरकारही खडबडून जागे झाले असून सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध घालण्यास सुरवात केली आहे.
बिजिंगमधील सर्व उद्याने अनिश्चित कालमर्यादेसाठी बंद ठेवण्यात आली असून शाळांना ऑनलाईन वर्गांचा पर्याय आखण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे बाहेरगावी आहेत, त्यांनी गरज असल्याखेरीज येऊ नये व जे स्थानिक ठिकाणी आहेत, त्यांना बाहेरगावी जाण्याची परवानगी नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान दुकाने व उपहारगृहे बंद करण्यात आल्याने स्थानिक ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात असून स्थानिक लोकांकडून पोलिस व प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत.