रामभाऊ जगताप, कांबळेश्वर, बारामती
खरंतर हा प्रवास आहे आयुष्याच्या वेगळ्या वाटेवरचा… गावाकडच्या मातीत राहून शेती-मातीशी नाते घट्ट ठेवतानाच आपल्या जन्मकार्याबाबत संवेदनशील राहीलेल्या गावाकडच्या पोरांचा..! फार तांत्रिक किंवा झगमगाटात न शिरता गावकुसातीलच प्रत्येकाच्या डोळ्यात समोर जे दिसतेय, ते जणू आपणच जगतो आहोत याची अनुभूती देण्याचा प्रयत्न करणाऱ्या साध्यासुध्या माणसांचा…!
होय, होय, आम्हीच चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीजमधील हरहुन्नरी कलाकार ..! तब्बल २ वर्षानंतर या विषयावर लिहावसं म्हणतो.. तुमच्याशी संवाद साधावासा म्हणतो.. त्याला कारणही असंच आहे. कोरोनाच्या काळात जग बंदिस्त केलं..आणि जगण्याची भ्रांत असलेल्या अनेकांपुढे अंधार पसरला. पुढे काय होणार, हे किती दिवस चालणार काहीही माहिती नव्हते.
अशावेळी एकलकोंडे होऊन जगाशी, आपल्याच माणसांशी संपर्क तुटलेली माणसं ओशाळवानी होऊ नयेत, त्यांच्यातील जगण्यासाठीचा संघर्ष ताजातवाना व्हावा म्हणून आम्ही व्यासपीठावर चढलो.. हे व्यासपीठ होतं.. चांडाळ चौकडीच्या करामती या नावाच्या वेबसिरीजचं…!
कोरोनाने अनेकांचे व्यवसाय धुळीला मिळवले.. कोरोनाच्या आपत्तीत अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. मात्र आपत्तीतही इष्टापत्ती असतेच.. नव्हे ती शोधावी लागते.. चांडाळ चौकडीच्या करामतीचा जन्म यातूनच झाला आणि पाहता पाहता या मनोरंजनाच्या साधनाने रसिक मायबापांच्या मायेचे आभाळ जिंकले. आज दोन वर्षात तब्बल १६ लाख ४५ हजार सबस्क्रायबर्सचं भांडवल आम्ही गोळा केलंय.. म्हणजे किती माणसं कमावली, तर ती अशी.. लाखांनी..! अर्थातच आमच्यावर बेमाप माया करीत असलेल्या या रसिक मायबापांनी सातासमुद्रापारही आम्हाला डोक्यावर घेतलं..
आम्ही बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावचे सारे रहिवासी.. लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकीचे बाळकडू सर्वांच्या अंगात मुरले असल्याने पथनाट्याला सुरवात केली. मग ते ग्रामस्वच्छता अभियान असेल, तंटामुक्त गाव अभियान असेल तसेच इतरही सरकारी योजना असतील.. आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडत राहीलो. हजारो पथनाट्याचे प्रयोग झाले. जिकडे जाऊ, तिकडे कौतुक व्हायचे. मात्र घरच्या उदरनिर्वाहाचा भार अंगावर पडला, तरी हे सामाजिक बांधिलकीचे खूळ काही केल्या जात नव्हते. त्याच्यापुढे पैसे किंवा उत्पन्न हा भाग आमच्यासाठी कधीच महत्वाचा नव्हता.
फोर जी आणि फाईव्ह जीच्या जमान्यात चित्रपटांच्या पुढील पॅटर्न म्हणजे वेबसिरीज आली आणि आम्हाला आपसूक एक वेगळी संधी मिळाली. चांडाळ चौकडीच्या करामतीच्या वेबसिरीजचा जन्म तर जग बंदिस्त होतानाच्या काळात झाला. लोक घरात बसून होते. त्यांना एकटे वाटू नये म्हणून आम्ही जिवाच्या आकांताने आपली उपजत विनोदीशैली त्यात ओतण्याचा प्रयत्न केला, लोकांना तो आवडला आणि चांडाळ चौकडीच्या करामतीची टिम दिवसेंदिवस फुलत गेली.
फक्त निखळ विनोद, एकमेव मनोरंजन हाच हेतू समोर ठेवून गेली दोन वर्षे ही वेबसिरीज सुरू आहे. आता येत्या ५ जानेवारी रोजी ती ३ वर्षांची होईल. ५ जानेवारी २०२० रोजी पहिला भाग प्रदर्शित झाला आणि तेथून कोणीच वळून मागे पाहीले नाही. प्रचंड प्रेमाचा भार असल्याने आम्हीी अगदी बेंबीच्या देठापासून काम करीत राहीलो.. जी जी उपजत विनोदबुध्दी व समोरच्याचा तणाव घालवण्यासाठी गावगाड्यातील परिस्थिती समोर उभी करता येईल, घटकाभर सारे दुःखाचे प्रसंग नजरेसमोरून हटवता येतील, ते ते विनोदी क्षण आम्ही देण्याचा प्रयत्न केला.
आजवर त्याला ५० कोटी रसिक मायबापांनी पसंतीची मोहोर उमटवली. एका गोष्टीचे समाधान आहे की, आपण जे करतो, त्याकडे फक्त निखळ मनोरंजनच म्हणून न पाहता, त्या भूमिकेशी समरस होत बाळासाहेब (भरत शिंदे ), रामदास जगताप (रामभाऊ), सुभाष मदने (सुभाषराव) किंवा एकूणच सर्वजण आपल्याच कुटुंबातले सदस्य आहेत अशा अर्थाने जी वागणूक मिळते ती जगाच्या कोणत्याही देशात, कितीही पैसे मोजून मिळणार नाही.
आम्ही गावाकडचे कलाकार.. परंतू शहराच्या चौकात असू देत किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात.. आपुलकी म्हणून अनेक जण येतात, भेटतात.. काम खूप चांगले आहे असे सांगतात, तेव्हा आयुष्य सार्थकी झाल्याचा आनंद मिळतो.
तसे पाहिले तर आजवर १४९ भाग चांडाळ चौकडीच्या करामतीचे झाले, थोडक्यात विचार करता आम्ही रसिक मायबापांसाठी गावातच १५० पिक्चर बनवले, ते प्रत्येक चित्रपट हिट बनले आणि सर्वांनी डोक्यावर घेतले असाच याचा अर्थ आम्ही लावतो आहोत.
येत्या १३ नोव्हेंबर रोजी या साखळीतील १५० वा एपिसोड येतोय.. खात्री आहे की, तो तुम्हाला आवडेलच.. शिवाय या निमित्ताने एक मैलाचा दगडही रोवला जाईल.. ग्रामीण भागातील कोणतीही चित्रपटसृष्टीची शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेली सामान्य घरातली पोरं महाराष्ट्रातल्या आबालवृध्दांसाठी सलग तीन वर्षे कष्टताना दिसली, त्याचा एक प्रवासही आमच्या मनात कायमचा कोरून जाईल. तुमचे प्रेम आहेच.. ते आणखी वृध्दींगत व्हावे हीच यानिमित्ताने अपेक्षा…!