पुणे – महान्यूज लाईव्ह
भाजपमध्ये गेलं की विषय संपतात.. क्लिन चिट मिळते.. भाजपच्या विरोधात बोलले की, फाईल उघडते. नसेल तर नव्याने तयार होते असं सांगत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना आता तुम्ही संजय राठोड यांच्या दिदी व्हा असा खोचक टोला लगावला आहे. शिंदे गट व भाजप एकत्र आल्यानंतर चित्रा वाघ यांचा संजय राठोड यांच्याविषयीचा विरोध मावळल्याने अंधारे यांनी ही टिका केली आहे.
भाजपबरोबर शिंदे गट सत्तेत आल्यापासून चित्रा वाघ शांत झाल्या आहेत. काल चक्क त्यांनी संजय राठोड हा विषय आता संपवू, त्याखेरीज महाराष्ट्रात खूप विषय आहेत. राठोड यांच्या विरेधातील लढा सुरूच राहील, मात्र तो न्यायालयात, तेथे माझाही लढा सुरू राहील. संजय राठोड यांना महाविकास आघाडीनेच क्लिनचीट दिलेली आहे. त्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्न तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे यांना विचारा असे वाघ म्हणाल्या होत्या.
आज तर एका पत्रकाराने संजय राठोड यांच्याविषयीचा थेट भिडणारा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला. संजय राठोड यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून तुम्ही त्यांचे राजकीय करिअर बरबाद केले असा आरोपवजा प्रश्न विचारताच चित्रा वाघ भडकल्या. त्यांनी या पत्रकारावर सुपारी घेतल्याचा आरोप करीत अशा पत्रकारांना पत्रकार परिषदेला बोलावू नका, ते सुपारी घेतल्यासारखे प्रश्न विचारतात असा उद्वेग व्यक्त केला.
त्यानंतर याचाच धागा पकडून जेव्हा एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सुषमा अंधारे यांना विचारले, तेव्हा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टिका केली. अंधारे म्हणाल्या, देवेंद्रजी बोलतात, तेव्हा आंदोलने होतात आणि जेव्हा बोलतात, तेव्हा आंदोलने संपतात. ज्या प्रकारे ईडी, सीबीआयचा ससेमिरा मागे लागताच भावना गवळी मोदीसाहेबांच्या बहिण झाल्या, तसे आता चित्रा वाघ यांनीही संजय राठोड यांच्या दिदी व्हावं असा टोला अंधारे यांनी लगावला.