मुंबई : महान्युज लाईव्ह
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यांच्याकडे ही मागणी केली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने सत्तार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीसह महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी यांनी ही सत्तार यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
आमदार डॉ. मनीषा कायंदे, राष्ट्रवादीच्या प्रदेशअध्यक्षा विद्या चव्हाण , वैशाली नागवडे , पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट,शितल हगवणे, निर्मला प्रभावळकर आदींसह महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सत्तार यांना त्वरित मंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी केली असुन तसे निवेदनही दिले आहे. भाजपच्या आमदार खासदार व पदाधिकारी अधिकारी हे सातत्याने महिलांच्या संदर्भात बदनामी अपमान करत वक्तव्य करीत आहे.यापुर्वीही मंत्री गुलाबराव पाटील, रवींद्र चव्हाण यांनीही महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते.