राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपनीमध्ये विविध कामांचे काम मिळवण्यासाठी स्थानिक स्वयंघोषित ठेकेदारांची टोळी तयार होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. या ठेकेदारी टोळीकडून काही कंपन्यांना प्रदूषणाचे नाव पुढे करून आंदोलन करण्याची धमकी देत ब्लॅकमेलचे प्रकार घडत असल्याचे चित्र आहे.
दौंड तालुक्यातुन जाणाऱ्या पुणे – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कुरकुंभ व पांढरेवाडी हद्दीत १९९३ मध्ये एमआयडीसी स्थापना झाली. या औद्योगिक वसाहतीत रासायनिक कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. नवनवीन कंपन्या येत आहेत. कुरकुंभ औद्योगिक कंपन्यांमुळे मोठा रोजगार उपलब्ध झाला असून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. या कंपन्यांमध्ये काही राजकीय नेते मंडळी यांचे समर्थक व नातेवाईक व स्थानिक अधिकृत ठेकेदार यांना विविध कामांचे ठेकेदारी आहे. यातच आता विविध कामांचे काम मिळावे यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या स्थानिक ठेकेदारांच्या टोळ्या कंपन्यामधील काम मिळावे यासाठी सक्रिय झाल्या असल्याचे चित्र आहे. त्यासाठी या ठेकेदारी टोळ्या अनेक कंपन्या मध्ये कामांचे ठेका मिळावे यासाठी हेलपाटे मारीत आहेत. कामाचा ठेका न मिळाल्यास त्यांच्याकडून संबंधित कंपनीला प्रदूषणवरुन लक्ष करीत दबाव आणला जात असल्याची चित्र आहे. कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. परिणामी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती डोके काढत आहे.
विविध स्वघोषित संघटना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या या औद्योगिक वसाहतीत सक्रिय झाल्या असून याठिकाणी भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभु शकतो. दौंड पोलिसांनी या प्रकाराला आळा बसावा यासाठी लक्ष घालण्याची आवश्यकता असुन या औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनीही अशा स्वघोषित व गुन्हेगारी ठेकेदारी टोळ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे