मुंबई : महान्यूज लाईव्ह
हर हर महादेव चित्रपटाच्या प्रकरणावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेच्या घटनाक्रमाची माहितीच डॉ. आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली आहे.
आज दुपारी एक वाजता वर्तकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. निकम यांचा आव्हाड यांना फोन आला, नोटीस देण्यासाठी माणूस पाठवत आहे, किंवा तुम्ही पोलिस ठाण्यात या असे त्यांनी सांगितल्यानंतर आव्हाड यांनी आपण मुंबईला निघालो असून पोलिस ठाण्यात येतो आणि त्यानंतर मुंबईला निघतो असे सांगितले व आव्हाड हे पोलिस ठाण्यात पोचले.
पोलिस ठाण्यात पोचल्यानंतर निकम यांनी त्यांना गप्पांमध्ये गुंतवले व तेथे काही वेळात पोलिस उपायुक्त राठोड आले. त्यांनी आदराने आव्हाड यांना वरूनच आदेश आहेत, मी काहीही करू शकत नाही. तुम्हाला अटक करावी लागेल असे सांगितले.
दरम्यान ट्विटरवरूनच डॉ. आव्हाड यांनी हा पोलिसी बळाचा वापर असून जो गुन्हा मी केलाच नाही, तो कबूलही करणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान आव्हाड यांच्या अटकेने राज्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान खासदार सुप्रिया सुळे, विद्या चव्हाण यांनी या कारवाईवर टिका केली असून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृहखातं आहे, त्याचा ते गैरवापर करीत असल्याची टिका चव्हाण यांनी केली असून सुळे यांनी जर आवाज उठवला म्हणून जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर स्वागत अशा शब्दात सरकारचा निषेध केला आहे.