चाळीसगाव – महान्यूज लाईव्ह
शेतकरी हा हाडाचा संशोधक असतो असे म्हणतात. शेतकऱ्यासाठी प्रत्येक आपत्ती ही एक इष्टापत्ती देखील घेऊन आलेली असते असेही अनेकदा दिसते.. सध्या देखील शेती परवडत नाही हे चित्र जागोजागी दिसत असताना तिकडे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या वाढे गावातील राजेंद्र पाटील या शेतमजूराने चक्क ६० एकर शेती भाडोत्री घेतली.. ती शेती अगदी व्यावसायिक पध्दतीने केली.. यावर्षी त्यांनी फक्त केळीच्या बागेत १ कोटींहून अधिक रकमेचे उत्पन्न मिळवले आहे.
विशेष म्हणजे केळी पिकावर सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव मोठा असतानाच्या काळात हे उत्पन्न मिळवले असल्याने त्याची चर्चा अधिक आहे. त्यापेक्षाही राजेंद्र पाटील यांनी १५० कामगारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला याचे कौतुकही अधिक आहे.
राजेंद्र हरी पाटील यांच्या या कर्तृत्वाची ही कहाणी. चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावचे रहिवासी असलेल्या राजेंद्र पाटील यांची स्वतःची केवळ दिड एकर शेती होती. पाटील यांनी कृषी पदवीदेखील घेतली आहे. त्यांनी नोकरी केली. मात्र नोकरीत जम बसला नाही आणि पाटील यांनी पुन्हा शेतीत उतरले.
मात्र दीड एकर शेतीत काही भागत नाही, म्हणून त्यांनी तेथीलच थोडी जमीन भाडोत्री घेतली. त्यात जम बसला आणि त्यांनी ही शेती वाढवत नेली. आता ६० एकरच्या वर ही शेती भाडोत्री घेतलेली आहे. या शेतीत त्यांनी वेगवेगळी पिके घेतली.
त्यातच केळीची लागवड केली. जळगाव जिल्ह्यातील केळीवर सीएमव्ही चा प्रादुर्भाव झाल्याने केळीच्या बागा अडचणीत सापडल्या असतानाच पाटील यांनी एक कोटीहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळवल्याने त्यांची चर्चा अधिक झाली. आपल्याला मिळत असलेले हे उत्पन्न या कामगारांच्या श्रमावरच मिळत असल्याचे श्रमाच्या या पुजाऱ्याने मनापासून मानले आणि मग दिवाळी या कामगारांबरोबर साजरी केली.