सातारा – महान्यूज लाईव्ह
गावातलं ड्रेनेज लिक होऊन घरापर्यंत पोचलंय, पार गोठ्यात पाणी साठून राहतंय.. दुर्गंधी वाढलीय असं अनेकदा ग्रामपंचायतीला सांगूनदेखील कोणीच लक्ष देत नसल्याने कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील दिपक जगताप या शेतकऱ्याने निषेध म्हणून चक्क त्यांचा रेडाच ग्रामपंचायतीत नेला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता.
वडगाव हवेलीचे ग्रामपंचायत कार्यालय दोन मजली आहे. दिपक जगताप यांनी गोठ्यातील रेडा सोडला आणि थेट ग्रामपंचायतीकडे नेला. ग्रामपंचायतीचे कार्यालय वरच्या मजल्यावर असल्याने जिन्यावरून रेडा नेला. जगताप यांनी रेडा वर का चालवलाय हे कोणालाच कळत नसल्याने तेथे बघ्यांचीही गर्दी झाली.
दरम्यान रेडा ग्रामपंचायत कार्यालयात नेला. तेथे नेल्या-नेल्या रेड्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुंदर कार्पेटवर शी
केली.. मग जगताप तेथेच बसून राहीले. कर्मचारी त्याला विनवत होते. मात्र अगोदर लिकेज काढा, मगच खाली जाणार असा निग्रह जगताप यांनी केला.
मग कर्मचाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्याला फोन लावून जगताप यांना समजावून सांगण्याची विनंती केली. तो फोन घेतल्यानंतरही जगताप यांनी दादा, तुम्ही अगोदर येथे या, ड्रेनेजच बोला, मगच खाली जाणार, मी कोणाचंच ऐकणार नाही असा थेट पवित्रा त्यांनी सांगितला.
काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी जगताप यांची समजूत घातली. लागलीच ड्रेनेज लिकेज काढण्याचे काम करण्याचे आश्वासन दिले. मग कोठे स्वारी खाली जायला तयार झाली. मग जिन्यावरून हळूहळू पाय खाली सोडत रेडा देखील खाली उतरला. मात्र त्याचा व्हिडीओ आता राज्यात व्हायरल झाल्याने जगताप यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अखेर रेडा नेऊन दाखवला अशी चर्चा सुरू आहे.