आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्याचा विमा कंपनीला दणका
सलमान मुल्ला, उस्मानाबाद
दिवाळीच्या काळात कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी 2020 मधील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीची व पिक विमा संदर्भात उपोषण केले होते. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी उपोषणाचे दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. तर पुणे जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश देखील दिले होते.
खरीप २०२० मधील हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई विमा कंपनीने अजूनही दिली नाही. आणखीनही कंपनीकडून एकूण ३४४ कोटी रुपये येणे आहेत. ते मिळावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती.
त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र देऊन जमीन महसूल अधिनियमाच्या अंतर्गत कंपनीच्या मालमत्ता जप्त करीत रकमेची वसुली करावी, अशी विनंती केली.
यानंतर आमदार पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांची नुकतीच भेट घेऊन कार्यवाहीस गती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार पुणे तहसीलदार यांनी विमा कंपनीचे कार्यकारी संचालक आशिष अग्रवाल यांना नोटीस पाठवून ७ दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थकबाकी जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
जोपर्यंत ही रक्कम वसूल होऊन आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आपला लढा, पाठपुरावा असाच कायम राहणार असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.