सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील निमगाव केतकी येथील रिअलाइमेंट रद्द होण्याच्या मागणीसाठी येथील ३१ शेतकऱ्यांनी सोमवार (दि. ७) पासून सुरू केलेल्या प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. आज गुरुवारी (दि.१०) आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी उपोषणास बसलेल्या पाच शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना निमगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
तात्यासाहेब वडापुरे, संदीप भोंग, मच्छिंद्र आदलिंग, हनुमंत बरळ, चंद्रकांत वडापुरे अशी तब्येत बिघडलेल्या असलेल्या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. उपोषणकर्ते रुग्णांवर निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुचित्रा गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद खाडे, डॉ. कैलास व्यवहारे, डॉ.अरविंद आरकिले, डॉ. सचिन हजारे रुग्णांवर उपचार करत आहेत.
काल(बुधवार) काही शेतकऱ्यांना अशक्तपणा जाणवला होता, मात्र त्यांनी ॲडमिट होण्यासाठी नकार दिला होता. उपोषणाच्या जागेवरच उपचार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती.
काल उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तसेच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुर्यवंशी यांनी भेटी देवून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली, मात्र उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते. आपला जीव गेला तरी उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले.
निमगाव केतकी येथील बाह्यवळणाचा निर्णय हा NHI च्या अधिपत्याखाली आहे. आम्ही प्रशासक म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्या NHI पर्यंत पोहचवल्या आहेत. तो जो निर्णय देतील तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू. वृद्ध शेतकऱ्यांनी या उपोषणातून माघार घेऊन प्रशासना सहकार्य करावे व आपली तब्येत सांभाळावी, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
दरम्यान आज निमगावच्या रिअलाइनमेंट होत असलेल्या रस्त्याची मोजणी सुरू होणार होती, त्यासाठी मोठा पोलीस फौज फाटा बोलवण्यात आला होता मात्र मोजणी झाली नाही.