बारामती – महान्यूज लाईव्ह
सहकारी संस्थेत शिपाई म्हणून काम करतानाच ग्रामपंचायतीतही शिपाई म्हणून बोगस कागदपत्रांच्या मदतीने नियुक्ती केली, संगनमताने त्याचा पगार काढला म्हणून शिपाई युवराज रामहरी पवार याच्यासह तत्कालीन सरपंच मनिषा किशोर फडतरे, ग्रामसेवक एम. एन. सालगुडे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संतोष मोहन सोनवणे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. त्यासाठी अगोदर त्यांनी प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या ग्रामपंचायतीतील पदनियुक्तीतील घोटाळ्यातून गुन्हा दाखल होण्याची ही बहुधा अशा प्रकारची पहिलीच वेळ आहे.
यामध्ये युवराज रामहरी पवार याने तत्कालीन सरपंच मनिषा फडतरे, ग्रामसेवक एम.एन. सालगुडे यांच्याशी संगनमत करून स्वतः सोसायटीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असतानाही ग्रामपंचायतीत शिपाई पदी बोगस नियुक्ती करून घेतली व एकाच वेळी दोन ठिकाणांहून पगार घेतला असा आरोप यामध्ये आहे.
तर सरपंच व ग्रामसेवकाने परिस्थिती माहिती असतानाही शासनाची फसवणूक केली म्हणून सोनवणे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामध्ये सकृतदर्शनी यामध्ये गुन्हा दिसून आल्याने न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला होता.