सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
यापूर्वी दाखल केलेली खुनाच्या प्रयत्नाची केस मागे घे असा दबाव टाकत कळंब येथे दोघाजणांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्याची फिर्याद दाखल केली असून गोळीबार व जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून दोघा जणांवर वालचंदनगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके यांनी फिर्याद दिली असून, सुयश घोडके हे कळंब येथील रणसिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. नऊ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास कळंब येथील आंबेडकर उद्यान येथे ते व त्यांचा मित्र महेश शंकर ढेकळे, पुतण्या रोहित अनिल घोडके, मयूर सुनील किर्दक व अक्षय भारत बनसोडे असे कट्ट्याच्या बाजूस असणाऱ्या सरकारी दवाखान्याच्या पायरीवर बसले होते.
त्यावेळी सुयश हे फोनवर बोलत असताना बजाज कंपनीची अपाची मोटरसायकल वरून अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यावेळी मयूर किर्दक हा तात्या पळ असे जोरात ओरडल्याचा आवाज आल्याने सुयश घोडके हे आवाजाच्या दिशेने गेले असता मोटरसायकलवर एक अनोळखी व्यक्ती व त्याच्या पाठीमागे सुरज दादासाहेब वाघमोडे हा बसलेला दिसला.
त्याच्याकडे पळत जाऊन सुयश याने मी इकडे आहे, त्यांच्या वरती गोळ्या का झाडतो असे विचारले असता, सुरज वाघमोडे याने हातातील बंदुकीने सुयश घोडके यांच्या दिशेने गोळी झाडली तेव्हा ते एका बांधकामाच्या आड लपले, त्यावेळी सुरज वाघमोडे यांनी आमच्यावर केलेली 307 ची केस मागे घे आज तुझा शेवटचा दिवस आहे. तुला खल्लास करतो असे म्हणत आणखी तीन गोळ्या झाडल्या व मोठ्याने जातीवाचक शिवीगाळ करत हवेत गोळ्या झाडत तो गाडीवर बसून गेला.
त्यानंतर सुयश घोडके हे लपलेल्या ठिकाणावरून बाहेर आले. पुतण्या रोहित, त्याचा मित्र मयूर व अक्षय हे दवाखान्याच्या अडोशास बसलेल्या ठिकाणावरून बाहेर आले, तेव्हा मयूर याने सांगितले की, मोटरसायकल चालवणाऱ्या अनोळखी व्यक्तीने आमच्या देखील दिशेने बंदुकीच्या गोळ्या झाडलेल्या आहेत.
त्यानंतर घरी गेले असता घरी सुयोग उर्फ अण्णा सोमनाथ घोडके यांनी सुयश यांना माहिती दिली की, घराचा दरवाजा लावून अभ्यास करत असताना दरवाजा वाजवला म्हणून दरवाजा उघडला असता गावातील गजानन किसन जाधव हा बंदूक घेऊन उभा असलेला दिसला. त्यामुळे घाबरून खाली वाकल्यानंतर त्याने एक गोळी झाडल्याचा आवाज आला व गजानन जाधव हा रस्त्याने पळत जात असताना दिसला अशी माहिती सुयोग यांनी दिल्याने सुयश घोडके यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून वालचंद नगर पोलिसांनी गजानन किसन जाधव व सुरज वाघमोडे या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.