युवराज जाधव, सांगली
बकऱ्यांचा बाजार दोन वर्षे बंद होता. कोरोनानंतर पहिल्यांदाच आटपाडी येथील उत्तरेश्वराच्या कार्तिक यात्रेत शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरला आणि चक्क ११ लाखांपासून ५० लाखांपर्यंतची किंमत बकऱ्यांना आली.
उत्तरेश्वराची यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द असून या यात्रेत शेळ्या- मेंढ्यांचा प्रसिध्द बाजार भरतो. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातूनही विक्रेते व खरेदीदार येतात. सध्या ही यात्रा सुरू असून सांगोला तालुक्यातील शिवणे येथील कुंडलिक एरंडे यांचा ४० लाखांचा बकरा या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरला आहे. त्यातही माडग्याळ जातीच्या बकऱ्यांच्या किंमती अगदी ७४ लाखापर्यंत असल्याचे सांगितले जात असल्याने या बकऱ्यांना पाहण्यासाठीही गर्दी झाली होती.
या यात्रेत आलेल्या बकऱ्यांच्या किंमती अगदी ५० लाखापर्यंत असल्याने यावर्षीच्या यात्रेची चर्चा अधिकच रंगली आहे. दहा हजारांहून अधिक शेळ्या-मेंढ्यांची विक्री या बाजारात होईल असा अंदाज असून फक्त चार तास चालणाऱ्या या बाजारात कोट्यवधींची उलाढाल आतापर्यंत झाली आहे. उत्तरेश्वर यात्रेची प्रसिध्दी मोठी असल्याने अगदी गोव्यापासून राजस्थानपर्यंतचे खरेदीदार येथे येत असतात.