मुंबई – महान्यूज लाईव्ह
पीएमएलए या विशेष कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना ईडीला फटकारले आणि त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयानेही एक महिना अभ्यास करून निर्णय दिलेल्या सत्र न्यायालयाविरोधात १० मिनीटांत निर्णय देऊ शकत नाही असे स्पष्ट करून ईडीला तोंडावर आपटवले.
संजय राऊत यांच्या जामीनाच्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खमक्या निर्णयाची आठवणही राज्याला झाली आणि त्यापेक्षाही ईडी हे फक्त विरोधकांवर उपसायचे हत्यार आहे असा जो विरोधकांकडून आरोप होतोय, त्या आरोपाला दहा हत्तींचे बळ कोर्टाने मारलेल्या ताशेऱ्यांमुळे मिळाले आहे.
पीएमएलए कोर्ट काय म्हणाले?
विशेष म्हणजे सत्र न्यायालयाने तब्बल महिनाभर या प्रकरणाची सुनावणी घेतली. यामध्ये संजय राऊतांच्या वकीलांचा युक्तीवाद प्रभावी ठरला असे म्हणावे लागेल. कोर्टाने जे ताशेरे मारले आहेत, त्यामध्ये म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटते, तरीही म्हाडाचा एकही कर्मचारी यामध्ये आरोपी नाही. एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसह मुख्य आरोपी असलेल्या वाधवान बंधूंनाही या प्रकरणात अटक केलेली नाही. सुनील राऊत यांना दिवाणी दाव्यासाठी अटक केली आणि त्यानंतर संजय राऊत यांना अटक केली, मात्र मुख्य आरोपींना सोडले आणि इतरांनाच अटक केली असे थेट न्यायालयानेच म्हटल्याने ईडीचे कान उपटले गेले आहेत.
अर्थात ईडी हे सरकारी व राजकीय हस्तक्षेपाचे हत्यार आहे हे म्हणायला आणखी वाव म्हणजे संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने आदळआपट करीत उच्च न्यायालय गाठले. तेथे तातडीने त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली, तेव्हा उच्च न्यायालयानेही ईडीला दरवाजे बंद केले. उच्च न्यायालयानेही ईडीला खालच्या न्यायालयाने एक महिना अभ्यास करून जो निर्णय दिला, त्यावर आम्ही दहा मिनीटांत कसा निर्णय देणार? असा प्रतिप्रश्न केला, शिवाय तुम्ही गुणवत्तेच्या आधारावर युक्तीवाद करा, एका दिवसाने काही होत नाही असे स्पष्ट करीत ईडीच्या पदरी निराशा टाकली.
आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे संविधानात एक तरतूद आहे ती म्हणजे, १०० अपराधी एकवेळ सुटले तरी चालतील, मात्र एक निरपराधाला शिक्षा होता कामा नये… आता अटकच बेकायदेशीर झाल्याने त्या १०२ दिवसांचे मुल्य काय करायचे हा देखील प्रश्न निर्माण झाला असून सरकारी यंत्रणांबद्दल सामान्यांच्या मनातही अविश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासाठी हे कारण पुरेसे ठरणार आहे.