राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
पुणे शहरातील उत्तमनगर येथील चोरीच्या प्रकरणात हव्या असलेल्या लकीसिंग टाक व निहालसिंग टाक याच्यावर आज युनिट तीनच्या पोलीस पथकाने सापळा रचला होता, मात्र लकीसिंगला ताब्यात घेतल्यानंतर यवतमध्ये पुणे पोलिसांच्या युनिट तीनवर निहाल टाक याने गोळीबार केला.
यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली. पुण्यातील चोरी प्रकरणी लकीसिंग गब्बरसिंग टाक हा फरार होता. युनिट नंबर तीनला लकी सिंग हा यवत येथील मानकोबावाडा येथे त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तेथे सापळा रचला होता.
सहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर, पोलीस कर्मचारी दिपक क्षीरसागर, प्रकाश पडवळ, प्रकाश कट्टे हे चौघेजण खाजगी वाहनाने त्या ठिकाणी येऊन दबा धरून बसले होते. आज पहाटे तीन वाजता लकी सिंग हा मोटरसायकल वरून तेथे आला. त्याने घरासमोर गाडी लावली.
त्याच्यासोबत निहालसिंग मन्नूसिंग टाक हा होता. लकी सिंग याला पथकाने ताब्यात घेतले. निहालला देखील ताब्यात घेतले, मात्र त्याचवेळी निहाल हाताला झटका देऊन पळून गेला. जाताना निहाल याने प्रकाश कट्टे यांच्या दिशेने मात्र हवेत गोळीबार केला. यातून कट्टे वाचले, मात्र निहाल हा फरार झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार व सरकारी कामात अडथळा आणल्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.