पुणे : महान्यूज लाईव्ह
निवडणूक आयोगाने आज राज्यातील 32 जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर पासून आचारसंहिता व अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोनशे ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
संपूर्ण राज्यातील दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होणार असल्याने एका अर्थाने विधानसभेची रंगीत तालीम या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगाचे सहसचिव किरण कुरुंदकर यांनी या संदर्भातील आदेश जारी केला.
काही दिवसांपूर्वीच राज्यातील विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत आता नव्याने सात हजार 751 ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रतीक्षेत होत्या त्यांच्या निवडणुकीचा मार्ग आज निवडणूक आयोगाने मोकळा केला
या नव्या निर्णयानुसार सप्टेंबर 22 पर्यंत मुदत संपलेल्या 2 हजार 53 ग्रामपंचायतींची निवडणुका नुकत्याच झाल्या असून आता उर्वरित ग्राम पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये 21 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी ज्या ग्रामपंचायतींच्या प्रसिद्ध झाल्या आहेत व डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत अशा ग्रामपंचायतींची यामध्ये निवड करण्यात आली आहे.
यानुसार 18 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर यादरम्यान अर्ज भरण्याची मुदत असून, अर्जाची छाननी पाच डिसेंबर 2022 रोजी सकाळी होणार आहे तर अर्ज माघारी घेण्याची मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग , सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.