सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावच्या हद्दीत कत्तलखान्यावर छापा टाकून इंदापूर व वालचंदनगर पोलिसांनी गोवंशसदृश्य शेकडो जनावरांचे मांस व इतर साहित्य जप्त केले. शेकडो जनावरांची कापलेली मुंडकी व पाय जमिनीत गाडून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.
या घटनेने खळबळ उडाली असून यातील आरोपी आरिफ यासीम कुरेशी, जाकीर अब्दुल मजीद बेपारी, हाजीमस्तान जाकीर बेपारी या तिघांवर व अज्ञात जागा मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सिद्धाराम रामन्ना गुरव यांनी सरकारच्या वतीने फिर्याद नोंदवली.
इंदापूरातील तरंगवाडी येथील कत्तलखान्यात शेकडो जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे , इंदापूर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अनिल तांबे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले, तेव्हा तरंगवाडी येथे इंदापूर – बारामती रोड लगत दक्षिण बाजूला एक किलोमीटर अंतरावर दाट झाडी झुडपांमध्ये गुरांची कत्तल केली गेली होती. तेथे पाणीसाठा करण्यासाठी तळे, जनावरे कापण्यासाठी सिमेंटचा कोबा, दोन इंजिन असलेल्या लोखंडी मशीन व जनावरांचे रक्ताचे डाग आणि प्लास्टिकच्या टिपाडात आतडी साठवलेली दिसली.
तसेच बाजूच्या मोकळ्या जागेत काही जनावरे देशी, गिर व जर्सी गाई, बैल, वासरे कापून त्यांची मुंडकी, पाय, धड, शिंगे, कातडी काढलेल्या अवस्थेत त्यांना मांस चिटकलेले हाडे दिसली. येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. सहाय्यक आयुक्त डॉ. तांबे यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी काढून घेतले. दरम्यान या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोल खड्डा खोदून त्यामध्ये ते गोवंशसदृश्य मांस नष्ट करण्यात आले.