दौंड : महान्यूज लाईव्ह
कुरकुंभ एमआयडीसीतील आगीचे लोण काही केल्या संपत नाही. आज केमिकल रसायन बनवणाऱ्या शोगन या कंपनीत रिअॅक्टरमधील पॅराडाईज क्लोरीन या रसायनाचा अचानक स्फोट झाला. यामध्ये आग लागली, स्फोट एवढा तीव्र होता की कंपनीतील पत्रे उडाले. यामध्ये तीन कामगार जखमी झाले असून त्यांचेवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी रसायन क्षेत्रातील एमआयडीसी असून, येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अनेकदा घटना घडल्यानंतर काळजी घेऊनही वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने येथे अपघात प्रतिबंधासाठी दीर्घकालीन सुरक्षा योजना राखण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज दुपारी कुरकुंभ येथील शोगन या मच्छर प्रतिबंधक तसेच इतरही प्रकारचे रसायन बनवणाऱ्या कंपनीत अचानक आग लागली. तांत्रिक दोषामुळे रिऍक्टरचा स्फोट झाला असून त्यात कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान यावेळी तेथे किती कामगार कार्यरत होते याची माहिती मिळालेली नसून प्राथमिक माहितीनुसार तीन कामगार या आगीत जखमी झाल्याची व त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अर्ध्या ते पाऊण तासाच्या विशेष प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.