कर्जत येथे रंगणार ‘सद्भावना चषक’ क्रिकेट सामने, कर्जत पोलीस व पत्रकार बांधवांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन
कर्जत – महान्यूज लाईव्ह
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची नेहमीच कसरत सुरू असते. मात्र नगर जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून आजपर्यंत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सातत्याने समाजाभिमुख उपक्रम घेत पोलिस मित्र ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकारली आहे. खासगी सावकारीवरील कारवाईमुळे चर्चेत आलेल्या या पोलिस ठाण्याने आज (ता.८) आगळावेगळा क्रिकेट सामना आयोजित केला आहे.
कर्जत पोलिस आणि पत्रकार यांनी ‘सद्भावना चषक’ क्रिकेट सामना आयोजित केला आहे. मंगळवार (दि.०८ रोजी) सकाळी ६ वाजता हे सामने दादा पाटील महाविद्यालयाचे शेजारी रस्त्यालगतच्या मैदानात होणार असून या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन राशीन येथे पोस्टमन म्हणुन कार्यरत असलेले पारधी समाजाचे रमेश पिंगा काळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
या सामन्यांमध्ये कर्जत पोलिसांविरुद्ध पारधी समाज बांधव, पत्रकारांविरुद्ध सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्जत डॉक्टर्स विरुद्ध सर्व सामाजिक संघटना असे सामने रंगणार आहेत. रोटरी क्लब ऑफ कर्जत आणि शिक्षक संघही सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला ‘सद्भावना चषक’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उपविजेता, प्रोत्साहन पर तसेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन अशी बक्षिसे ही दिली जाणार आहेत.
पारधी समाजात गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्यांवर कारवाया केल्या जातात, मात्र त्यानंतर त्यांच्यात सुधारणा होऊन ते समाजात आपली वेगळी ओळखही निर्माण करू शकतात त्यामुळे त्यांना आपलेसे करून आपल्यात स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे चंद्रशेखर यादव यांनी बोलताना सांगितले.
या सामन्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सामने पाहण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव आणि प्रांत अधिकारी श्री अजित थोरबोले यांच्या हस्ते बक्षीस वाटप होणार आहे..