युवराज जाधव, सांगली.
ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील. जत तालुक्याच्या व्हसपेठ गावात आई शेतजमीन नावावर करून देत नाही. अनेकदा सांगूनही ऐकत नाही म्हणून ३७ वर्षाच्या करंट्या पोरानं ५५ वर्षीय आईच्या नरड्याचा घोट घेतला.
जत पोलिसांनी शांताबाई अण्णाप्पा कोरे यांच्या खूनप्रकरणी मुलगा सुरेश आण्णाप्पा कोरे याला अटक केली आहे. या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली. रविवारी (ता.६) दुपारी ही घटना घडली.
व्हसपेठ गावात शा्ंताबाईंच्या नावावर ४० एकर शेतजमीन आहे. आण्णाप्पा यांचे निधन झाल्याने गेल्या काही वर्षांपासून सुरेश आणि शांताबाई हे दोघेच घरात राहत होते.
गेल्या काही दिवसांपासून सुरेश हा आईकडे शेतजमीन नावावर करून देण्याची मागणी करीत होता. मात्र या शेतजमीनीतील काही तुकडा सुरेश हा विकणार असल्याची कुणकुण शांताबाईंना लागल्याने त्यांनी जमीन आताच नावावर करून देण्यास तयारी नसल्याचे सांगितले. त्याचा राग सुरेशला होता.
रविवारी दुपारीही घरात बसल्यानंतर सुरेश याने आई शांताबाई हिला निक्षून सांगितले, तेव्हाही शांताबाई यांनी शेतजमीन नावावर करून देणार नसल्याचे सांगताच सुरेश याने घरातीलच दगड उचलला आणि आईच्या डोक्यात घातला. त्यानंतर एकापाठोपाठ दगडाचे ठोके त्याने आईच्या चेहऱ्यावर व डोक्यावर केले. घाव वर्मी लागून शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.