अमोल काटे, कोषाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य.
जाणीवपूर्वक काही चित्रपट, साहित्य निर्मिती करायची, चित्रपट माध्यमातुन होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी हे कदापिही सहन करता येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यावर साकारण्यात आलेल्या कथा, कादंबरी, साहित्य हा महाराष्ट्रातील कायम चर्चेचा आणि वादाचा विषय राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मांडणी करताना अनेकांनी त्यात अनैतिहासिक, संदर्भहीन व काल्पनिक गोष्टी अंतर्भूत केल्याचा शिवप्रेमींचा आक्षेप होता. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटनांनी साहित्य क्षेत्रातील या वादावर प्रबोधनाच्या माध्यमातुन जनजागृती केली, प्रसंगी आक्रमक भूमिकाही घेतल्या.
जाणीवपूर्वक कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विपर्यास करत असतील तर इतिहासाच्या पुनर्लेखनाद्वारेच त्यांना उत्तर देता येऊ शकते ही गोष्ट प्रकर्षाने समाजातील अनेक शिवप्रेमींच्या लक्षात आली. त्यानंतर अनेक इतिहास संशोधक, अभ्यासक समोर आले आणि त्यांनी ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेऊन अथक परिश्रमातून वास्तविक शिवचरित्र समोर आणण्याचा प्रयत्न केला. साहित्य क्षेत्रातून होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी थांबवण्यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न आज समाजमान्य झाले आहेत.
साहित्याच्या क्षेत्रात चुकीचे इतिहासलेखन करणाऱ्या लोकांना ही धोबीपछाड मिळाल्याने अलीकडच्या काळात साहित्य क्षेत्रातील वाद कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळते; परंतु एका नव्या वादाने जन्म घेतल्याचेही जाणवत आहे. तो वाद म्हणजे नाट्य-चित्रपट क्षेत्रातून होणारी शिवचरित्राची अवहेलना…
खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मराठी, हिंदी भाषेतून चित्रपटांची निर्मिती होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पूर्वीच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट आले होते. त्या चित्रपटांमध्ये किमान एक दर्जा, साधेपणा आणि आपलेपणा तरी वाटायचा. परंतू अलीकडच्या काळात येणाऱ्या चित्रपटांतून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली होणारा इतिहासाचा विपर्यास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी हा खूप गंभीर मुद्दा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे या देशातील लोकांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय आहेत याची सर्वांना कल्पना आहे. लोकांच्या मनातील या भावनिक कोपऱ्याचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढले तर व्यावसायिकदृष्ट्या आपल्याला खूप फायदा होईल हे अनेक निर्माते, दिग्दर्शकांचे ठोकताळे सर्वसामान्य लोकांनाही समजतात. त्यावर आक्षेप असायचेही काही कारण नाही.
परंतु आपल्या श्रद्धास्थानांना समोर ठेवून ज्यावेळी सर्वसामान्य लोक चित्रपट पाहायला जातात, तेव्हा चित्रपटांतून दाखवला जाणारा इतिहास आणि वास्तविक इतिहास यात फरक असल्याचे जाणवल्यानंतर सर्वसामान्य शिवप्रेमींमधून येणाऱ्या नाराजीच्या प्रतिक्रिया साहजिक आहेत.
ऐतिहासिक विषयांवर चित्रपट काढत असताना सिनेमॅटिक लिबर्टी ही संकल्पना कुठल्याही निर्माता किंवा दिग्दर्शक यांना इतिहासातील वास्तविक गोष्टींचा विपर्यास करण्याचे स्वातंत्र्य देत नाही. कलेच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणे हा गुन्हा आहे.
अलीकडच्या काळात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हिरकणी, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, हंबीरराव, तान्हाजी, शिवप्रताप गरुडझेप, हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात असे काही शिवचरित्रावर आधारित चित्रपट काढण्यात आले आहेत. या चित्रपटांमध्ये कमी अधिक फरकाने इतिहासातील तथ्यांची मोडतोड केल्याचे आक्षेप शिवप्रेमींनी वेळोवेळी व्यक्त केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रामुख्याने मराठा इतिहास असल्याचे अनेक ऐतिहासिक कागदपत्रांद्वारे सहज सांगता येऊ शकते, परंतु अलीकडच्या काळात ‘मराठा’ या शब्दाऐवजी जाणिवपूर्वक ‘मराठी’ या शब्दावर भर देऊन चित्रपटांतील डायलॉग निर्माण केले जातात ही खटकणारी बाब आहे.
शिवकाळात कधीही, कुठेही मराठी लोक, मराठी लोकांचा इतिहास असे शब्दप्रयोग प्रचलित असल्याचे दिसून येत नाही. मग ऐतिहासिक विषयावरील चित्रपट बनवताना त्यातून मराठा शब्द वगळण्यामागचा हेतू काय हा प्रश्न निर्माण होतो. केवळ काही राजकीय पक्ष आणि त्यांची ध्येयधोरणे समोर ठेवून, त्यांना पूरक होतील अशा पद्धतीने चित्रपटांची निर्मिती केली जात असेल आणि त्यातून इतिहासाचा गळा घोटला जात असेल तर ती निश्चितच निषेधाची बाब आहे.
कुठल्यातरी राजकीय पक्षांचे उदात्तीकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वापर करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, यावर अशा सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
ऐतिहासिक विषयावरील चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्यावर विवाद निर्माण करणे हे अनेक दिग्दर्शकांचे मार्केटिंग तंत्र असते. हे सगळे जाणिवपूर्वक केले जाते. मात्र यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वापर व्हावा हे महाराष्ट्राला शोभा देणारे नाही.
तानाजी चित्रपटाच्या वेळी हे अनुभवायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे सर्वच जातीधर्मातील रयतेचे स्वराज्य असताना तानाजी चित्रपटात जाणिवपूर्वक त्याला गोब्राह्मणप्रतिपालक असे स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. VFX इफेक्टच्या अत्याधिक वापरामुळे चित्रपटाचा ऐतिहासिक शिवकालीन बाज हरवून त्याला हॉलिवूडच्या मार्व्हल मुव्हीजप्रमाणे स्वरुप प्राप्त होते. त्यातील अतिरंजितपणामुळे त्याचा अक्षरशः विनोद बनून जातो. याचे गांभीर्य निर्माते, दिग्दर्शकांनी ठेवले पाहिजे.
वेडात मराठे वीर दौडले सात नावाचा एक चित्रपट येत आहे. त्यामध्ये तर चक्क इतिहास घडवणाऱ्या सात मावळ्यांपैकी सहा मावळ्यांची नावेच बदलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे इतिहासाला धरुन नाही. नेसरीच्या खिंडीत प्रतापराव गुजर यांच्यासोबत बहलोलखानाच्या फौजेवर तुटून पडणाऱ्या विसाजी बल्लाळ, दिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे या वीरांची नावे बदलून दत्ताजी पागे, जिवाजी पाटील, चंद्राजी कोठार, मल्हारी लोखंडे, सूर्याजी दांडकर आणि तुळजा जामकर अशी काल्पनिक नावे वापरल्याचे काही इतिहास अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिले आहे. ही तर सरळसरळ इतिहासाची मोडतोड आणि त्या वीरांचा अवमान आहे.
हर हर महादेव चित्रपटाच्या बाबतीत काय बोलावे हा प्रश्न निर्माण होतो. कित्येक अनैतिहासिक बाबी, प्रसंग या चित्रपटातून दाखवण्यात आल्याबाबत शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनाच दुय्यम स्थान दिले गेले आहे.
ऐतिहासिक विषयांवरील चित्रपट बनवताना त्यात असणारी पात्रे, त्यांची वेशभूषा, त्यांचा शिरस्ता, ऐतिहासिक संदर्भ अशा बाबी विचारात न घेताच चित्रपट बनवून समाजाच्या माथी मारणे हे चुकीचे आहे. यातून केवळ छत्रपती शिवरायांचे नाही तर त्यांच्या मावळ्यांचेही अवमूल्यन होते.
दिगपाल लांजेकर, प्रवीण तरडे किंवा डॉ.अमोल कोल्हे यांच्या चित्रपटांबाबतही शिवप्रेमींमध्ये अनेक आक्षेप आहेत. त्यांनीही ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काही बाबतीत काळजी घेतली नसल्याचे शिवप्रेमींचे मत आहे.
एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत असताना त्यातील काही बाबी या पूर्वनियोजित कटातून होत असल्याचेही दिसून येते. इतिहासात घडलेल्या घटनांना वर्तमानकाळातील राजकीय फायद्यासाठी वापरण्याची पद्धतच रुढ करण्याचा प्रयत्न होत आहे.
त्यामागे काही राजकीय किंवा व्यावसायिक भूमिका असू शकतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर त्यासाठी करणे योग्य नाही. इतिहासाचा असा बाजार मांडणे कुणालाच न पटणारे आहे. यातून पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये चुकीचा इतिहास जाऊ नये याची काळजी वाटते. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ऐतिहासिक घराण्यांतील सहकाऱ्यांनीही या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे.
मागण्या :
१) महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तूनिष्ठ चरित्र समोर आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमण्याची घोषणा केली होती. त्याबाबतीत लवकरात लवकर पावले उचलली जावीत. वाद विरहित अधिकृत शिवचरित्र आले तर अनेक प्रश्न सुटू शकतात.
२) छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत, चित्रपटातून त्यांची बदनामी करणे हा देशद्रोह आहे. असा गुन्हा करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात यावी. ३) ऐतिहासिक विषयावरील चित्रपटाच्या कथा, पटकथा मंजूर करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने त्या इतिहासकारांच्या समितीकडे पाठवून त्यातील संदर्भ तपासून घ्यावेत आणि मगच त्यांना मंजुरी द्यावी.
४) चित्रपटामुळे वाद होऊ नयेत आणि सामजिक तेढ किंवा संघर्ष होऊ नयेत यासाठी निर्माते, दिग्दर्शक यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सामजिक संघटना, इतिहास अभ्यासक यांना विश्वासात घेऊन चित्रपट दाखवावा आणि त्यांच्या ज्या सूचना असतील त्या विचारात घ्याव्यात.
५) सेन्सर बोर्डाने हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाच्या निर्माते, दिग्दर्शक यांना नोटीस काढून इतिहासाच्या मोडतोडीबाबत जाब विचारावा आणि चित्रपटातील अनैतिहासिक गोष्टी वगळण्याची सूचना करावी.