पुणे महान्यूज लाईव्ह
पुण्यात मोबाईल चोरायचे, बिहारमध्ये जाऊन विकायचे.. ४० टक्के रकमेवरच हे मोबाईल मिळत असल्याने बिहारीही चांगलेच सोकावले होते. पुणे पोलिसांनी एका नव्यानेच उघडलेल्या दुकानातील १०२ मोबाईलच्या चोरीच्या निमित्ताने हे पुणेरी कनेक्शन भुईसपाट केले.
पुण्यातील उरुळी देवाची येथील न्यू साई मोबाईल या नव्यानेच सुरू केलेल्या मोबाईलच्या दुकानातील १०२ महागडे मोबाईल २३ ऑक्टोबर रोजी चोरीला गेले होते. दुकान फोडून केलेल्या या चोरीसाठी पोलिस जंग जंग पछाडत होते.
हडपसर पोलिसांना दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने एकाचा संशय आला. त्याचा माग काढत पोलिस डुक्कर खिंडीतील इंगळे कॉर्नर येतील देशमुखवाडीतील साहिल अनिल मोरेपर्यंत पोचले. साहिलला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली.
त्यावरून त्याने साथीदारांची नावे सांगितली. लक्ष्मण जाधव, संकेत निवगुणे, पोपट धावडे, गजानन मोरे अशी साथीदारांची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरवात केली आणि संकेत पोलिसांच्या तावडीत सापडला.
संकेत याला वारजे माळेवाडी येथून ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा लक्ष्मण जाधवकडे मोबाईल असून तो हे मोबाईल विक्रीसाठी बिहारमध्ये पोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक साधनांचा वापर करीत पोलिसांनी बिहारमधील छपरा गाठले.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण, सहायक आयुक्त बजरंग देसाई, निरीक्षक अरविंद शिंदे, विश्वास डगळे, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, समीर पांडूळे यांच्या पथकाने ही कारवाई करताना लक्ष्मण जाधव याला जेरबंद केले. जाधव हा तेथील मोनुसिंग या विक्रेत्याला ४० टक्के एवढ्या किंमतीने हे मोबाईल विकत असल्याचे यातून उघडकीस आले. पोलिसांनी २२ लाखांचे ९६ मोबाईल हस्तगत केले आहेत.