बारामती – महान्यूज लाईव्ह
राज्यातील पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षकपदाच्या १०३ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पुण्याचे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून आनंद भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली असून पिंपरी चिंचवडहून आता आनंद भोईटे हे जिल्ह्याचे बारामती विभागाचे पोलिस दलाचे नेतृत्व करणार आहेत.
बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांची हिंगोलीचे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी आता इंदापूर तालुक्यातील सणसरचे सुपुत्र आनंद भोईटे हे बारामती विभागाचे नवे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतील.
सणसरच्या एका शेतकऱ्याचा मुलगा अगोदर फौजदार व नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पदाची उंची आपल्या कर्तृत्वाने गाठतो आणि नंतर अंधेरीपासून शिर्डीपर्यंत व पिंपरी चिंचवडमधील मोठमोठे गुन्हे उकल करतो, त्याचे कौतुक इंदापूर-बारामतीकरांना होतेच, मात्र आता त्यांची थेट नियुक्तीच या भागात झाल्याने दुग्धशर्करा योग इंदापूर तालुक्याच्या वाट्याला आला आहे.
आज राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी या बदल्यांचे धोरण जाहीर केले असून पुणे शहराच्या उपायुक्तपदी जालन्याचे विक्रांत देशमुख यांची तर पिंपरी चिंचवडच्या परिमंडळ २ च्या पोलिस उपायुक्तपदी असलेले आनंद भोईटे हे बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षकपदी नियुत्त करण्यात आले आहेत.
आजच्या बदल्यांमध्ये पुण्याचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची मुंबई शहराच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बारामतीकर राहूल श्रीरामे यांची पुणे शहर पोलिस उपायुक्तपदावरून राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्तना पाटील यांची पुणे पोलिस बिनतारी यंत्रणेच्या पोलिस अधिक्षकपदावरून पुणे शहराच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तेजस्वी सातपुते यांची मुंबई शहराच्या उपायुक्तपदी, भाग्यश्री नवटके यांची पुणे शहर गुन्हे शाखेवरून चंद्रपूरच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी बारामतीत उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत राहीलेले बापू बांगर यांची सोलापूरहून साताराचे अप्पर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.