बाळासाहेब तांबे, भिगवण.
अडचणीच्या काळात खासगी सावकारांकडे जात आहात?… त्यानंतर जो पिळवणूकीचा त्रास सहन करावा लागतो, त्याचे बरेच काम पोलिसांनाच निस्तारावे लागते.. आता राज्यातच लोकप्रतिनिधींनी बॅंकांना ताळ्यावर आणावे, तरच खासगी सावकारीचा विळखा काही प्रमाणात कमी होईल.. भिगवण पोलिसांनी असा एक गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये तक्रार आल्यानंतरही पोलिसही चक्रावून गेले.
भिगवण पोलिस ठाण्यात 1) बापुराव नभाजी कुलाळ 2) संगीता बापुराव कुलाळ दोघे, रा. तरटगाव, ता. फलटण, जि. सातारा, 3) बाबु गेणु वाघमोडे, रा, मलठण, ता. दौंड, जि. पुणे. 4) कुंडलीक जर्नाधन भिसे, रा. पिंपळे, ता. इंदापुर, जि. पुणे व त्यांचे इतर तीन साथीदार नाव व पत्ता माहीत नाही या ७ जणांवर महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायदा 2015 चे कलम 39,45 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पिंपळे (ता. इंदापूर) येथील अंबादास दत्तु भिसे या 45 वर्षीय शेतकऱ्याने पोलिसांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2018 ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत बापुराव नभाजी कुलाळ 2) संगीता बापुराव कुलाळ 3) बाबु गेणु वाघमोडे, 4) कुंडलीक जर्नाधन भिसे व त्याच्या इतर तीन साथीदारांनी अंबादास भिसे यांच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेऊन 2 लाख रूपये 5 टक्के व्याजाने दिले होते.
त्यापोटी तारण म्हणून अंबादास यांच्या मालकीचे मौजे पिंपळे येथील जमीन गट क्रमांक 28 मधील एक एकर शेतजमीन खरेदीखत करून घेतले. दरम्यान व्याजाची मुद्दल व व्याज असे वेळोवेळी ६ लाख ९५ हजार रुपये अंबादास भिसे यांनी देऊनही त्यांची शेतजमीन फिर्यादीला परत न देता फिर्यादीकडेच व्याजाची व मुददल असे एकुण 40 लाख रूपयांची मागणी केली जात होती.
दरम्यान या शेतजमीनीची नोंद होऊ नये म्हणून अंबादास भिसे यांनी तक्रारी अर्ज दिला, म्हणून बापुराव कुलाळ, बाबु बाघमोडे, कुंडलीक भिसे व इतर तीन अनोळखी इसम यांनी बेकायदेशीर गर्दी जमाव जमवून अंबादास यास शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. त्यावरून नाईलाजाने अंबादास यांनी भिगवण पोलिसांना गाठले व फिर्याद दिली. या गुन्हयाचा तपास फौजदार रूपेश कदम हे करीत आहेत.