मुंबई : महान्यूज लाईव्ह
अलीकडील काळात चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चित्रपट तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा चित्रपटांना चांगला प्रतिसादही मिळतो आहे. मात्र असे चित्रपट तयार करताना ‘ सिनेमॅनिक लिबर्टी ‘ च्या नावाखाली मूळ इतिहासाचीच मोडतोड केली जात असल्याचे दिसते आहे. आता यावर शिवछत्रपतीच्या घराण्याचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
नुकत्याच आलेल्या तसेच येऊ घातलेल्या ‘ हर हर महादेवा ‘ आणि ‘ वेडात मराठे वीर दौडले सात ‘ या चित्रपटांवर त्यांचा प्रामुख्याने आक्षेप आहे. सिमेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासातील वास्तविक गोष्टींचा विर्पयास करण्याचे स्वातंत्र्य कोणाही निर्माता किंवा दिर्ग्दशकाला नाही. सध्या या लिबर्टीच्या नावाखाली चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचे त्यांनी म्हणले आहे. याचवेळेस जर अशा प्रकारे इतिहासाचा विर्पयास केला जात असेल तर गाठ आपल्याशी आहे, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.
‘ वेडात मराठे वीर दौडले सात ‘ हा महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट असून त्याचे पोस्टर त्यांनी रिलीज केले आहे. या पोस्टरवरच संभाजीराजेंचा आक्षेप असून ‘ यातील पोशाख बघितला तर ते मावळे तरी वाटतात का ‘ असा सवाल त्यांनी केला आहे. ‘ हर हर महादेव ‘ या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने महत्वाची भूमिका साकारली आहे. राज ठाकरे यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते. पण या चित्रपटातून इतिहासाचा विपर्यास झाल्याचा संभाजीराजेंचा आक्षेप आहे.
अलिकडच्या काळात सात ऐतिहासिक विषयावरील चित्रपट आले असून या सगळ्या चित्रपटातून कमी अधिक प्रमाणात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड झाली असल्याचा आक्षेप शिवप्रेमींनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक विषयावरील चित्रपटाची कथा – पटकथा मंजूर करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने इतिहासकारांच्या समितीकडे पाठवून त्यातील संदर्भ तपासून मगच परवानगी द्यावी. हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांच्या निर्मात्यांना नोटीस काढून जाब विचारावा आणि चित्रपटातील अनैतिहासिक गोष्टी वगळण्याची सूचना करावी, अशी मागणी शासनाकडे त्यांनी केली आहे.