राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस व वरवंड येथील ग्रामदैवत यांच्या यात्रेस येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची जंगी तयारी ग्रामस्थांनी केली आहे मात्र, पाटसला यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावगुंड व टवाळखोरांच्या टोळक्यांमुळे असुरक्षितता व गुन्हेगारीचे सावट असल्याचे चित्र सध्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आहे.
कोराना महामारीमुळे सर्व यात्रा उत्सव दोन वर्षापासून बंद होत्या. मागील वर्षी ही यात्रा उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने पोलीस प्रशासनाने यात्रा उत्सव कमिटीला नोटीस बजावल्या होत्या. पाटस व वरवंड या दोन्ही मोठ्या गावच्या यात्रा एकाच दिवशी असुन यात्रेला मोठ्या संख्येने गर्दी होत असते. यामुळे यवत व पाटस पोलीसांवर ताण पडतो, मात्र त्यातच गुन्हेगारीमुळे पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. त्याला कारणही तसेच आहे. मागील वर्षीच्या यात्रा उत्सवाच्या काही महिन्यांपूर्वी यात्रेत झालेल्या वादातुन दोन टोळ्यांमध्ये भांडणे होऊन दोन युवकांची हत्या झाल्याची घटना घडली होती. या हत्याकांडास यात्रेतील जुना वाद हा कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.
या हत्याकांडाला एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. स्थानिक गाव पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पाटस परिसरात युवकांची गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा उत्सव कमिटीने यात्रेची जोरदार तयारी केली आहे, मात्र यात्रेत येणाऱ्या पाहुण्यांचे, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य पद्धतीने नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. यात्रेला दरवर्षी आकाशी पाळणे, खेळणे, यात्रा मैदान परिसरात गावगुंड व टवाळखोर टोळक्यामुळे गालबोट लागत असून गर्दीचा फायदा घेऊन महिलांची व मुलींची छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. तसेच दादागिरी, शिवीगाळ करून यात्रेत शोभा वाढवणाऱ्या आकाशी पाळणे, खेळणेवाले, तमाशा कलावंत यांनाही या टवळाखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यवत व पाटस पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो, मात्र पोलिसांना यात्रा उत्सव कमिटी कडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
एकीकडे शेजारील वरवंड गावच्या यात्रा उत्सव कमिटीने यात्रेच्या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने नियोजन करून पोलीस प्रशासन यांची बैठक घेऊन सुरक्षितता बाबत आढावा घेऊन सविस्तर चर्चा विचारविनिमय करून योग्य नियोजन केल्याचे चित्र आहे, त्यांच्या या नियोजनाचे खुद्द पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीही कौतुक केले. यात्रेला गालबोट लावणारांची हयगय करू नका. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावा, कोणताही गाव पुढारी त्यांना सोडण्यासाठी पुढे येणार नाही, अशी हमी वरवंड यात्रा उत्सव कमिटीने पोलिसांना दिली. मात्र पाटस यात्रा उत्सव कमिटी कडून अशी जबाबदारी घेतली जात नसुन यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांची , दर्शनासाठी होणारी गर्दींची संख्या पाहता महिला, लहान मुले, मुली, जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेची व दक्षतेची काळजी म्हणून योग्य पद्धतीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. तसेच गावगुंड व टवाळखोरांच्या उच्छादामुळे होणाऱ्या त्रासाला आळा बसण्यासाठी व त्यांच्यावर ठोस अशी कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.