दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज व वरवंड येथील ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज यांची यात्रा उत्सव येत्या सोमवार (दि ७ ) आणि मंगळवार (दि८) रोजी होणार आहे. पाटस व वरवंड या दोन्ही गावच्या यात्रा एकाच दिवशी असून यात्रेची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली आली आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पाटस व वरवंडकर सज्ज झाले असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने देण्यात आली.
पाटस चे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिरात सोमवारी पहाटे काकड आरती तसेच सकाळी नऊ वाजता श्री नागेश्वर देवास लघु रुद्राभिषेक कार्यक्रम होणार आहे व सायंकाळी पाच ते नऊ वाजता देवाला दंडवत घालण्याचा कार्यक्रम तसेच रात्री साडेनऊ वाजता लेझीम व झांजपथकाच्या गजरात शोभेची दारू व फटाक्यांच्या आतिषबाजीत देवाच्या छबिनेची मिरवणूक होणार आहे.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा व रात्री नऊ वाजता कै, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान पाटसच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तींचा जंगी आकडा यंदाही गाजणार आहे. यावर्षी देशातील नामांकित मल्ल्यांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा मैदानी खेळ होणार आहे. तीन मानाच्या कुस्त्यांसाठी ग्रामस्थांच्या वतीने आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या आखाड्यातील शेवटची कुस्तीही महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख विरुद्ध उत्तर प्रदेश केसरी बंटी कुमार यांच्यात होणार असून या कुस्तीसाठी ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब केसरी प्रवीण मोला यांच्यात होणार असून या कुस्तीसाठी १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे तसेच हवेली केसरी माऊली कोकाटे विरुद्ध हरियाणा केसरी प्रवीण कुमार यांच्या होणार असून या कुस्तीसाठीही १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.
या तीन मानाच्या कुस्तीसह महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन तसेच राज्यातील विविध नामांकित मल्ल्यांचा कुस्त्यांचा जंगी सामना यात्रेनिमित्त कुस्ती शौकीनांना पाहता येणार आहे. तसेच वरवंड येथील ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने या दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी पहाटे-मध्यरात्री श्रींचा महाभिषेक,भाविकांचे नवसाचे ध्वज आणि दंडवत व रात्री ७ वा ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींची छबिना आणि पालखी मिरवणूक आणि मानकरी पाटलांचा लोटांगण सोहळा,मानकरी बाराबलुतेदार आणि सोहळा पथकं, कारागीर यांना बिदागी वाटप आणि रात्री श्री गोपीनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थ आणि पै-पाहुणे यांच्या करमणुकीसाठी वसंतराव नांदवळकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्ती आखाडा आणि रात्री ८ वाजता रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, श्री नागेश्वर मंदिर व श्री गोपीनाथ महाराज मंदिर परिसर तसेच गावातील प्रमुख धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.
यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी येताना रांगेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने देवदर्शन घ्यावे,आपल्याकडील मौल्यवान वस्तू यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी, वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी सुरक्षित ठिकाणी व काळजीपूर्वक आपली वाहने पार्किंग करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी गावातील स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांना,पोलीस कर्मचारी यांना सहकार्य करावे, तसेच महिला आणि मुलांच्या खेळणीच्या,खाऊच्या दुकानांमधील गर्दी नियमित आणि नियंत्रित करण्यासाठी सहकार्य करावं, पाळणे आणि हौसेचे खेळ याठिकाणी महिलांना जाणूनबुजून त्रास देणाऱ्या आणि छेडछाड करण्याच्या हेतूने त्याठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या समाजकंटकांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. असे आवाहन वरवंड यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.