शिरूर : महान्यूज लाईव्ह
घोडगंगा ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामधेनू आहे. प्रत्येकाच्या प्रपांचाशी निगडित असलेली कामधेनू वाचविण्यासाठी सभासदांनी पुढे यावे, सहकारातील मक्तेदारी मोडून काढावी असे आवाहन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरविंददादा ढमढेरे यांनी केली.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकासमोर घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराची सभा घोडगंगा किसान क्रांती पॅनलने आयोजित केली होती.
यावेळी दादा पाटील फराटे, सुरेश पलांडे, कौस्तुभकुमार गुजर, अनिल काशीद शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे यांची भाषणे झाली. या वेळी ढमढेरे पुढे म्हणाले की, कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवारांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आणली आहे. आमच्याबद्दल बोलताना विचार करून बोला, आम्ही बोललो तर तुमच्या जन्म कुंडल्या बाहेर काढू असे ठणकावून सांगितले.
यावेळी ऊस उत्पादकांना सल्ला देत असताना चोरांच्या हातात कारखाना देऊ नका, पश्चातापाची वेळ येईल, जातीपातीचे राजकारण सोडून सर्वजण एकत्रित या असा सल्ला दिला. दरम्यान कारखाना सभासद वारसांना गेल्या अनेक वर्षांपासून न्याय मिळत नाही, वारस होण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे, परंतु स्वतःच्या मुलाला संचालक केले यावर आता विचार करण्याची वेळ आली असल्याचे आबासाहेब गव्हाणे यांनी सांगितले.
सहकारातील हाहाकार थांबविण्यासाठी यावेळी सभासदच क्रांती घडवतील असे दादा पाटील फराटे यांनी सांगितले. यावेळी उमेदवार आबासाहेब गव्हाणे, महेश ढमढेरे, सुरेश पलांडे, राहुल गवारे, महिला चेतना ढमढेरे, ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, शिंदे गटातील शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी संघटना, बाबाजी ढमढेरे आदी उपस्थित होते.