विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये लिलाव पद्धतीने कापूस खरेदी विक्री सुरु झाली आहे. लिलाव पद्धतीने कापूस खरेदी विक्रीला बारामती मर्चन्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव व प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
यावेळी वाघोलीकर यांनी सांगितले की, बारामती बाजार समितीची ओळख यापुर्वीची कॉटन मार्केट म्हणून होती. सन १९७७ पूर्वी त्यावेळी आवारात एक ते दिड लाख क्विंटल आवक होत होती. ३५ वर्षानंतर परत कापसाचे लिलाव होत असल्याने याचा आनंद होतोय.
भविष्यात बारामती बाजार आवारात कापसाची मोठी आवक होईल व कॉटन मार्केट म्हणुन बारामती बाजारपेठ विकसित होईल. पुर्वीप्रमाणे तालुक्यातील इतर संस्थांनी जिनिंग उभारुन सहभाग घ्यावा. त्यामुळे कापसाला चागले दिवस येतील. बाजार समितीने आवक व लागवड वाढी बाबत शेतक-यांना प्रोत्साहन द्यावे व कापुस पिकावर परिसंवाद घेऊन शेतक-यांना उत्पादन वाढी बाबत माहिती द्यावी.
व्यापा-यांना सुविधा देऊन कापसासाठी शेड उभारावे असे मत जवाहर वाघोलीकर यांनी व्यक्त केले. दरम्यान पहिल्या दिवशी कापसाची ३० क्विंटलची आवक होऊन ८९०१ रुपये प्रति क्विटल दर मिळाला. सरासरी ७५०० रुपये प्रति क्विंटल दर निघाला. कल्पेश सोनवणे यांच्या आडतीवर शिरवली येथील शेतकरी राजेंद्र जानु मदने या शेतक-यास ८९०१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. यावेळी बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, उमेश सोनवणे, केशवराव मचाले यांचे आडतीवर कापसाची आवक झाली.
खरेदीदार म्हणुन अमोल वाडीकर, बाळासो फराटे, संभाजी किर्वे, निलेश भिंगे यांनी सहभाग घेतला. दरम्यान बारामतीत कापसाचे लिलाव दर बुधवार व शनिवार या दिवशी सकाळी ११.०० वाजता सुरु होतील. शेतक-यांनी आपला कापुस स्वच्छ व निवडुन आणावा. त्यामुळे आणखी चांगला दर मिळेल.आज बारामती व फलटण या तालुक्यातुन कापसाची आवक झाली अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
यावेळी बारामती कृषी बाजार समितीचे माजी सदस्य रमेशराव गोफणे, अनिल खलाटे, सुनिल पवार, दत्तात्रय सणस, राजेंद्र बोरकर, ज्ञानदेव कदम, सुर्यकांत गादिया, शरद भिंगे व बाजार समितीचे माजी सचिव शिर्के, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर, मिलिंद सालपे तसेच इतर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.