दौंड : महान्युज लाईव्ह
शेत जमिनीवरील नवीन शर्तीचा शेरा कमी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोपातून दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडीच्या तलाठ्याची बारामती विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सोनाली राठोड यांनी नुकतीच मुक्तता केली.
बाळासाहेब चव्हाण असे या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत शेतकरी ज्ञानदेव बबनराव आखाडे यांनी फिर्याद दिली होती. याबाबतचा खटला बारामती विशेष न्यायालयात सुरु होता. या तलाठ्याची रुपये ५० हजार रुपये लाच घेतल्याच्या खटल्यातून न्यायालयाने मुक्तता केली.
फिर्यादी आखाडे यांच्या शेतजमिनीवर नवीन शर्तचा शेरा कमी करण्यासाठी तलाठी चव्हाण याने पन्नास हजार रुपये लाच मागितली होती, अशी फिर्याद शेतकरी आखाडे दिली होती. आरोपीच्या वतीने अॅड सचिन पाटील व अॅड. विशाल बर्गे यांनी काम पाहिले. संबंधित शेत जमिनीवर असलेला शेरा कमी करण्यासाठी तलाठ्याला अधिकार नाहीत.
त्यामुळे आरोपीने फिर्यादीकडे पैशाची मागणी करण्याचे काही एक कारण नव्हते. तसेच त्यानेही काम होणार नाही अशा माणसाकडे पैसे देण्याचे कारण नव्हते, असा युक्तिवाद आरोपीच्या वकीलांनी केला. फिर्यादीने तहसीलदारांकडे सातबाऱ्यावरील नवीन शर्तीचा शेरा कमी करणे करण्याबाबत प्रकरण दाखल केले नव्हते.
तसेच आरोपीकडून केवळ ४५ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. तर आरोपीवर ५० हजार रुपये मागितल्याच्या आरोप केला होता. सरकारी कर्मचारी, पंच यांनी सापळा रचल्याबाबत मोठी तफावत असल्याचे अॅड पाटील व अॅड. बर्गे यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी तलाठ्याची या गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता केली.