बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक आज संध्याकाळी दोन टोळक्याच्या गटात वाद झाल्याचे समजते. या वादादरम्यान एक जण जखमी झाला असून, या ठिकाणी गोळीबार झाल्याची अफवा पसरली. अर्थात पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिला नाही.
या ठिकाणी आज संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती दिली जात आहे. यामधील एका जखमीला बारामतीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र हा प्रकार कशातून झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही, तसेच हाणामारीतून एकजण जखमी झाला की, शस्त्राच्या वारामुळे याचीही कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही. गणेश जाधव असे या तरुणाचे नाव असून त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने या घटनास्थळी भेट दिली असून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान स्थानिक ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मात्र आम्हाला कोणताही आवाज ऐकू आला नसल्याचे सांगितले, तेथील कामकाजही नियमितपणे सुरू आहे. परंतु या ठिकाणी गोळीबार झाल्याची अफवा मात्र तिकडे शहरात पसरली. कथित घटनेनंतर येथे भेट दिली असता या पेट्रोल पंपावरील कामकाज मात्र नियमितपणे सुरू होते.
या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. इंगळे यांनी बारामतीतील खाजगी दवाखान्यात जाऊन तिथेही भेट दिली.