संदीप मापारी पाटील, बुलडाणा
दिवाळीच्या काळात सुट्टी असल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील डोरव्ही येथील कार शिकत असलेल्या शिक्षक महिलेचा व तिच्या दहा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेत पती शिक्षक बचावल्याची माहिती पुढे आली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात देऊळगावराजा येथे घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून विहीरीत कोसळलेली कार काढण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
आज (ता.३) दुपारी देऊळगावराजा येथून चिखली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. कार शिकत असतानाच चुकून ब्रेकऐवजी स्वाती यांच्याकडून अॅक्सिलेटर दाबला गेल्याने कार उसळून पुढे गेली आणि पुढच्या तब्बल ८० फूट खोल असलेल्या विहीरीत कार कोसळली.
या घटनेनंतर पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनाच्या मदतीने ही कार बाहेर काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.
सिध्दी अमोल मुरकुट (वय १० वर्षे) व स्वाती अमोल मुरकुट (वय ४० वर्षे) अशी या मायलेकींची नावे असून अमोल मुरकुट हे जाफराबाद तालुक्यात शिक्षक पदी कार्यरत आहेत. स्वाती या देखील शिक्षिका होत्या.