भवानीनगर – महान्यूज लाईव्ह
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील सणसर येथे छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीसाठीचे चित्र कसे असेल याचे संकेत कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिले, मात्र खरोखरच व्यासपीठावर आलेले कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप व सहकार्य केल्यास आपण स्वतः उभे राहू असे स्पष्टपणे सांगितलेले सतीश काकडे यांची एकत्रित वज्रमूठ कारखान्याच्या रणांगणात दिसणार का याची आता उत्सुकता आहे.
छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीला अद्याप काही काळ आहे. न्यायालयीन लढाईत या कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली गेल्याने आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक संचालक पदाचा काळ सध्याच्या संचालक मंडळाला मिळाला आहे. अजूनही कारखान्याची निवडणूक नक्की कधी सुरू होणार याची पुरेशी कल्पना नाही. मात्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कारखान्याच्या निवडणूकीची तयारी मात्र सुरूच आहे.
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सहकाराच्या हितासाठी म्हणून हातमिळवणी केलेल्या पृथ्वीराज जाचकांचे संचालक मंडळाशी जुळलेच नाही. अगदी संचालक मंडळाच्या बैठकीस बसण्यास प्रतिबंध करेपर्यंत या वादाची परिणती झाली आणि पुन्हा जाचक यांनी शड्डू ठोकला. त्यानंतर गेल्या काही महिन्यात तर ते भाजपच्या अधिक जवळ जाताना दिसत असून खुदद् अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या उपस्थितीत त्यांनी सहकार परीषदेचेही आयोजन केले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर जाचक यांची भूमिका आता थेट विरोधकाची व आरपार असेल असेच जाचक यांनी दाखवून दिले आहे.
आता जाचक हे कार्यक्षेत्रातील विरोधकांची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. काल (ता.२) सणसर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली. या उस परिषदेच्या इतर निर्णयांपेक्षा व्यासपीठावर अविनाश घोलप यांची उपस्थिती, बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी केलेले संयमी भाषण याची चर्चा अधिक झाली. या चर्चेदरम्यानच खुद्द जाचक यांनी घोलप यांना तिसऱ्यांदा एकत्रित येण्याचे आवाहन केले आणि ही वज्रमूठ कायम राहीली, तर आपण एक वेगळा इतिहास घडवू असा विश्वास दिला.
तर दुसरीकडे कारखान्याच्या निवडणूकीत काय होईल ते माहिती नाही, मात्र संपूर्ण राज्य ही निवडणूक पाहिल आणि निवडणूक कशी झाली यापेक्षा ती कशी लढली गेली याचीच चर्चा अधिक होईल असे सांगत या निवडणूकीतील ट्विस्ट वेगळीच असल्याचे संकेत त्यांनी दिले.
याच सभेत शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपण सोसायटी मतदारसंघातून छत्रपती कारखान्याची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कधी नव्हे ते काकडेंचा प्रवेश छत्रपती कारखान्याच्या निवडणूकीतही होणार काय हा प्रश्न पुढे आला आहे. तसे झाल्यास सोमेश्वरच्या परिसरात अजित पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे जाहीर केलेले सतीश काकडे हे सहकारात विरोधकाचीच भूमिका बजावणार का? हेही येत्या काळात दिसून येईल.
अर्थात छत्रपती कारखान्याच्या वार्षिक सभेत, बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रमाच्या निमित्ताने अविनाश घोलप यांनी सार्वजनिक कार्यक्रमात, विशेषतः सहकाराच्या कार्यक्रमात आपली थेट उपस्थिती दाखवली आणि काही वर्षानंतर त्यांनी काल सणसर येथे पहिल्यांदाच छत्रपती कारखान्याच्या परिस्थितीवर भाष्य करीत ३ हजार रुपये प्रतिटनापर्यंतचा भाव देता येऊ शकतो असे सांगत मागणीची पहिली कोंडी फोडली.
जाचक यांनी त्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे, अद्याप त्यांनी थेट टाळी दिलेली नाही, मात्र भाषणाच्या सुरवातीला त्यांनी अहिस्ता-अहिस्ता असे सांगत अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र विरोधकांच्या व्यासपीठावर घोलप थेट उपस्थित झाल्याने कार्यक्षेत्रातील सत्ताधाऱ्यांच्या भुवया उंचावणार यात काही नवल नाही.