मुंबई – महान्यूज लाईव्ह
बऱ्याच मोठ्या गोंधळ व राजकीय घाईगर्दीनंतर भाजपने उमेदवारी अर्ज काढून घेतलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपचे समर्थक हार मानण्याच्या तयारीत नाहीत. काही दिवसांपूर्वी नोटाला मतदान करा असे म्हणणारे भाजपच्या समर्थकांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आता माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी नोटा साठी नोटा वाटल्या जात असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान या संदर्भात परब यांनी निवडणूक आयोग व पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली आहे. फाटाफुटीनंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणूकीला महत्व असून या निवडणूकीत मतदान कमी व्हावे, जे होईल, त्यात नोटा ला अधिक व्हावे यासाठी युध्दपातळीवर राजकीय प्रयत्न सुरू आहेत.
३ नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्या अंधेरीत मतदान होणार आहे, हे मतदान विक्रमी व्हावे यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मैदानात उतरले असून दुसरीकडे नोटाचा प्रभाव वाढावा यासाठी भाजप व मित्रपक्षांचे नेते जीवाचे रान करीत असल्याचे चित्र या मतदारसंघात दिसत आहे.