पुणे महान्यूज लाईव्ह
दिवाळी म्हटले की, साऱ्यांनाच मामाच्या गावाची ओढ असते. त्यातही शहरी भागातील मुलांना आकर्षण तर असतेच, मात्र हेच आकर्षण खेड तालुक्यातील आडगावात दोन निष्पाप मुलांच्या जीवावर बेतले..
सार्थक ढोरे व शिवम गोपाळे ही दिवाळसणासाठी मामाच्या गावाला आलेली शाळकरी मुलं पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेली असताना बुडाली.
रविवारी ही दुर्घटना घडली. पोहण्यासाठी आडगावातील पाझर तलावात गेलेली सार्थक, शिवम व प्रतिक गोपाळे ही तीन मुले बराच वेळ आली नाहीत, म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.
त्यात शोधाशोध करताना प्रतिकने सांगितलेल्या घटनेने साऱ्यांच्याच अंगावर काटा आला. पाझर तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने नाकातोंडात पाणी शिरून सार्थक व शिवम हे बुडाले. मात्र प्रतिक कसाबसा पाण्याच्या कडेने पोहत आला होता.
मग नातेवाईकांनी रविवारी दुपारपासूनच या मुलांना शोधण्याची मोहिम सुरू केली. मात्र त्यांना शोधण्यासाठी अखेर स्थानिक नागरिकांसह एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली. त्यानंतर त्या्ंचा मृतदेह आज (मंगळवारी) आढळून आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली होती.