शिरूर : महान्यूज लाईव्ह
घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा संकटात असून सत्तेची मुजोरी अन् दहशत मोडून काढण्यासाठी यावेळी शेतकरी सभासद हेच मोठी क्रांती घडवून आणणार असल्याचे प्रतिपादन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केले.
घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून घोडगंगा किसान क्रांती पॅनलने प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा महिलांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना दादा पाटील फराटे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेली २५ वर्षे ताब्यात असताना कर्जाच्या खाईत लोटण्याचे पाप सत्ताधारी गटाने केले असून सत्तेची मुजोरी सुरू आहे. कारखान्याचे अनेक प्रश्न आहेत. यावेळी सत्तेत परिवर्तन करून सभासद हेच क्रांती घडवून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी किसान क्रांती पॅनलचे उमेदवार तसेच सर्वपक्षीय नेते, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून गुरुवारी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर शुक्रवारी दुपारी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी वेळ कमी असल्याने शुक्रवार पासूनच प्रचारास प्रारंभ करण्यात आला. घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर यापूर्वी आमदार अशोक पवार यांची सत्ता होती. यावर्षी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.