बारामती : महान्यूज लाईव्ह
लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगावात घडली आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी दिलेल्या पैशावरून झालेला वाद अखेर भावाच्या खूनापर्यंत पोचला.
या प्रकारात मृत्यू पावलेल्या भावाचे नाव कल्पेश अरुण धुळप ( वय २६, रा. हाऊस नं. २, पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी, माळेगाव ) असे आहे तर त्याचा खून करणाऱ्या त्याच्या लहान भावाचे नाव मंथन ( वय २३ ) आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मंथन याला अटक करण्यात आलेली आहे.
कल्पेश व मंथन हे सख्खे भाऊ आहेत. मोठा भाऊ कल्पेश हा काहीही कामधंदा करत नसल्याने आईवडिलांनी आठवडयापूर्वी कल्पेशला नवीन चप्पल व्यवसायासाठी १ लाख ४० हजार रुपये दिले. मात्र कल्पेश याने दिलेल्या पैशाची गुंतवणूक शेअर बाजारात केली होती. मंथनने या पैशाबाबत विचारणा केली असता सदर पैसे शेअर बाजारात गुंतवले आहेत, त्यामुळे आता माझ्या खात्यावर नाहीत, त्यामुळे मी नंतर पैसे देतो असे सांगितले. याच कारणावरून वाद होऊन मंथन याला कल्पेशने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याचाच राग मनात धरून मंथन याने घरातील चाकूने कल्पेशच्या मानेवर व छातीवर वार केले. यामध्येच कल्पेशचा मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपी मंथनला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.