इंदापुर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात सहा अज्ञात दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून रोख रकमेसह तीन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे.
२७ ऑक्टोबरच्या रात्री पावणे अकरा वाजता सहा दरोडेखोर घराची आतली कडी उचकटून घरात शिरले. कालिंदा अशोक कुबडे यांच्या घरी हा प्रकार घडला. त्यांनी प्रथम सासरे ज्ञानदेव सिताराम कुबडे यांना शस्त्राचा धाक दाखवला. गळ्याभोवती लोखंडी जंब्या आणि डोक्यावर चाकू धरून खोलीत ३ ट्रॅंकमध्ये ठेवलेले ६० हजाराची रोख रक्कम, १ लाख रुपये किंमतीचे सव्वा तोन तोळ्याचे कंठन, ५० हजार रुपये किमतीचे सव्वा एक तोळा वजनाचा सोन्याचा मिनी कंठन, २२ हजाराची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किमतीची चार ग्रॅंम वजनाची सोन्याची अंगठी, २२ हजार रुपये किंमतीची कानातील दोन फुले, आठ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन रिंगा, ५० हजार रुपये किंमतीचे सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे मळी आणि डोरले, चार हजार रुपये किंमतीची नथ, दोन हजार रुपये किंमतीची पैंजण व एक हजार रुपये किंमतीचे पायातील चांदीचे दागिने असा रोख रकमेसह ३ लाख ३३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केली.
त्यानंतर दरोडेखोरांनी कालींदा कुबडे यांच्या जाऊ झोपलेल्या खोलीचा दरवाजा जोरात धक्का देऊन उघडला. त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यातील दोघांनी त्यांच्या तोंडावर बुक्क्या मारून त्यांना जखमी केले. घरातील इतर लोकांना हत्यारे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. कालिंदा कुबडे यांच्या मुलाच्या पायावर सळईने मारून त्यालाही जखमी केले. त्याच वेळी कालिंदा याचे पती अशोक कुबडे हे कोयता घेऊन आल्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.