दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहर व परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालताना सरपंचवस्ती येथे रस्त्याच्या कडेला मोटरसायकल लावून उभे असलेल्या लोकांना येथे का उभा राहिलात? असे विचारले असता त्यातील दोघांनी पोलिसांना अरेरावी करीत धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना घडली.
या प्रकरणी दोन जणांवर दौंड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. ऋषीकेश उर्फ सोन्या सुरेश साळेकर (रा.सरपंचवस्ती दौंड ता.दौंड जि.पुणे) व किरण आकडे (पुर्ण नाव माहीत नाही, रा. बंगलासाईड ता. दौंड जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड पोलीस ठाण्याचे हद्दीत दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश भोसले व बी.पी जाधव हे सोमवारी ( दि.२४) रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना गोपाळवाडी हद्दीत असलेल्या सरपंच वस्ती परिसरातील राजवाडा हॉटेल जवळ अंधारामध्ये पाच व्यक्ती हे रस्त्याचे कडेला मोटार सायकल लावुन थांबलेले दिसले,
त्यावेळी पोलिसांनी त्यांना तुम्ही येथे का थांबलेला आहात? असे विचारत असताना त्यापैकी एकाने अंगावर धावून येऊन तुला काय करायचे आहे ते कर, तू काय आमचे वाकडे करणार असे म्हणुन शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. या प्रकरणी पोलीस हवालदार महेश भोसले यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.