मुंबई : महान्यूज लाईव्ह
‘ आई कुठे काय करते ‘ या मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरला ऑनलाईन हॉटेल बुकींगचा चांगलाच फटका बसला आहे. ऑनलाईन माध्यमातून हॉटेल बुक करताना तिची फसवणूक झाली आहे. मात्र ही बातमी देताना माध्यमांनी स्वत: मधुराणी गणपतीपुळ्याच्या संबंधीत हॉटेलमध्ये गेली असल्याची बातमी दिल्याने मधुराणी माध्यमांवर चांगलीच नाराज झाली आहे.
दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी मधुराणीचे पती प्रमोद प्रभूलकर व तिची मुलगी स्वराली गणपतीपुळे येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल दोन दिवसासाठी १७ हजार रुपये देऊन बुक केले होते.
हे हॉटेल शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचे आहे. चार स्टार दर्जाच्या या हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलमध्ये त्यांच्या नावाने कोणतीच बुकींग झाली नसल्याचे त्यांना तेथील मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले. मॅनेजमेंटकडूनही योग्य वागणूक मिळाली नाही. या प्रकारामुळे मधुराणी आणि त्यांच्या पतीला चांगलाच धक्का बसला.
अधिक चौकशी करता ही फसवणूक हॉटेलकडून झाली नसल्याचेही यावेळी उघड झाले. हॉटेलची वेबसाईट हॅक करून काही उत्तर भारतीय व्यक्तींनी हा प्रकार केल्याचे लक्षात आले. यामध्ये आणखी एका व्यक्तीचीही एक लाख साठ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहे.
या संदर्भात माध्यमातून बातम्या येऊ लागल्याने अखेर मधुराणीने समाजमाध्यमावर एक पोस्ट टाकून संबंधित प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये तिने गणपतीपुळे येथे झालेल्या या प्रकारामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला असल्याचे आणि आपले पती आजारी पडल्याचेही म्हणले आहे. मात्र माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये मधुराणीचे नाव घेतले गेल्यामुळे ती माध्यमांवर चांगली नाराज झाली आहे.
तिची पोस्ट सोबत देत आहे.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
गेले ५ महिने मी जाणीपूर्वक सोशल मीडियावर कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे.
कालपासून ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा ‘ ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणुक ‘ , अशा बातम्या काही नामांकित वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत.
पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही.
माझी एक छोटी सर्जरी झाली असल्याकारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन .
गणपतीपुळ्यातील हॉटेल मध्ये माझी लेक स्वराली आणि प्रमोद दोघच गेले आहेत. तिथे त्यांच्याबरोबर जे घडले ते अत्यंत चूक आहे. काल ह्या सगळ्या मनस्तापामुळे प्रमोदची तब्येत सुद्धा बिघडली आहे. पण दोघे सुखरूप आहेत. त्यांच्या प्रमाणे इतर सुद्धा अनेक जण फसवले गेले आहेत. ह्याचा लवकरात लवकर तपास लगायला हवा. आणि ह्या सगळ्यांचे पैसे परत मिळायला हवेत .मला आज सकाळासून शेकडो मेसेजेस व फोन येत आहेत.पत्रकारांनी नीट माहिती न घेता केवळ माझ्या नावाचा वापर करून हेड लाईन छापली आहे. ह्या बेजबाबदारपणाचा खेद आणि निषेध.