सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीकडून विकास कामांच्या बाबतीत होत असलेली अडवणूक स्पष्ट करत, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होणा-या सापत्नपणाच्या वागणुकीमुळे भाजपचा झेंडा हाती घेतला आणि अशाच वेळी सावंत यांनी काँग्रेस सोडली याचा आनंद होवून, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क इंदापूरच्या काँग्रेस भवनसमोर रस्त्यावर फटाके उडवून एकमेकांना पेढे भरवत चक्क आनंदोत्सव साजरा केला. यामुळे स्वप्निल सावंत यांच्यावर काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.
एकीकडे स्वप्निल सावंत यांनी विकासकामांच्या बाबतीत मित्रपक्षांकडून होत असलेली गळचेपी पक्षाच्या वरिष्ठांकडेही मांडलेली होती. शहरातील श्रीराम सोसायटीमध्ये रस्ता मंजुरीसाठी मागणी करूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुसरीकडे वर्ग केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची तक्रार गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. त्यांना काहीच फरक पडला नाही, असे मत सावंत यांचे आहे. आपल्या भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण भाजपचा रस्ता धरल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला. मात्र दुसरीकडे इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष पदाचा स्वतःहून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदापूरच्या काँग्रेस भवनसमोर फटाके वाजवून व मिठाई वाटून केला जल्लोष केला. इंदापूर तालुका काँग्रेसला लागलेली इडा पिडा दिवाळीच्या पाडव्या निमित्त टळली, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष मिलिंद साबळे, विद्यार्थी काँग्रेस (NSUI) चे प्रदेश सचिव अभिजीत गोरे देशमुख, युवक काँग्रेसचे इंदापूर शहर अध्यक्ष सुफियान जमादार, इंदापूर काँग्रेस कमिटीचे महासचिव संतोष शेंडे, युवक काँग्रेसचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष अरुण राऊत, नयीम शेख,किरण पासगे, संदीप शिंदे हे सर्व उपस्थित होते.