शिरूर : महान्यूज लाईव्ह
शेतकरी बांधवांनो संकट जरी मोठं असलं तरी धीर सोडू नका, आपण संकटाशी लढा देऊ, सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडूच, मी इथे अश्रू पुसण्यासाठी आलो आहे, असे सांगत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर दिला.
शिरूर तालुक्यातील मलठण येथे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आले असता त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रथमच शिरूर तालुक्यात आलेल्या आदित्य ठाकरे यांनी थेट जमिनीवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुमचे पंचनामे किती झाले ? असा सवाल केला.शेतकरी मोठ्या अडचणीत आहे,प्रचंड पावसाने शेतीचे नुकसान झालं आहे. सरकार म्हणून कृषिमंत्री अजून कुठे बांधावर आले नाही. तर या सरकारमधील कृषिमंत्री कोण हेच अद्याप अनेकांना माहीत नाही. परिस्थिती खूप गंभीर आहे, शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे. संकट मोठं असलं तरी शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहील, अशी ग्वाही देत स्वतःच कोणीही बरं वाईट करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे म्हणत धीर दिला.
सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडू यासाठी लढा देणार असल्याचे आदित्य यांनी उपस्थितांना सांगितले. मलठण येथून वाघाळे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आदित्य यांनी नुकसानीची पाहणी करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी सुमारे २० मिनिटे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रांताधिकारी, प्रशासन यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. लवकरच शेतकऱ्यांच्या व्यथा शासनदरबारी मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,शिवसेना उपनेते सचिन अहिर, उपजिल्हाप्रमुख संजय देशमुख, पोपट शेलार,शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.